युक्रेनमधील स्थितीबाबत सुरक्षा परिषदेत भारत आणि चीनने घेतली ‘ही’ भूमिका

नवी दिल्ली- युक्रेनमधील स्थितीबाबत संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत आणलेल्या ठरावात 11 देशांनी ठरावाच्या बाजूनं मतदान केलं, तर रशियानं नकाराधिकार वापरला. भारत, संयुक्त अरब आमिरात आणि चीन तटस्थ राहिले. भारतानं नंतर आपली बाजू स्पष्ट केली आहे आणि उभय देशांनी पुन्हा राजनैतिक चर्चेचा मार्ग अवलंबावा असं आवाहन केलं आहे.

दरम्यान, युक्रेनमधील हिंसाचार तातडीनं थांबवावा असं आवाहनही भारतानं केलं आहे. सर्व मतभेद आणि तंटे मिटवण्यासाठी संवाद हाच मार्ग असल्याचं भारतानं म्हटलं आहे. रशियानं नकाराधिकार वापरल्यानं हा ठराव मंजूर होऊ शकला नाही.

सुरक्षा परिषदेत भारताचे प्रतिनिधी टी.एस. तिरुमूर्ती म्हणाले की, ‘युक्रेनमध्ये सुरू असलेल्या घडामोडींमुळे भारत खूप चिंतेत आहे. हिंसा आणि शत्रुत्व त्वरित संपवण्यासाठी सर्व प्रयत्न केले जावेत अशी आमची विनंती आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी अजूनपर्यंत कोणताही उपाय शोधण्यात आलेला नाही. आम्ही भारतीय जनतेच्या कल्याणाबाबत आणि सुरक्षिततेबाबत चिंतेत आहोत, यात युक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय विद्यार्थी सामील आहेत. हे खेदजनक आहे की, मुत्सदेदगिरीचा मार्ग सोडला गेला. आपल्याला पुन्हा त्यावर परतावे लागेल. या सर्व कारणांमुळे भारताने या प्रस्तावापासून दूर राहणे पसंत केले आहे.’

दरम्यान, युक्रेनवर हल्ला करण्याचा निर्णय घेणं ही रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या रणनीतीतली भयंकर चूक असल्याचं मत नाटोच्या सदस्य राष्ट्रांच्या नेत्यांनी व्यक्त केलं आहे. रशियावर यापूर्वीच मोठ्या प्रमाणात आणि अभूतपूर्व निर्बंध लादण्यात आले आहेत आणि ते संबंधित भागधारक आणि युरोपियन संघासह इतर आंतरराष्ट्रीय संघटनांशी जवळून समन्वय साधत राहतील, असं नाटोने जाहीर केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

नाटो क्षेत्रात तसंच सागरी मालमत्तेच्या परिसरात भूदल आणि हवाई दल तैनात केल्याचं नाटोने दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे. लोकशाही मार्गाने निवडण्यात आलेले युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष, संसद आणि सरकार तसंच देशाच्या धैर्यशाली नागरिकांच्या पाठीशी नाटो संपूर्ण ताकदीने उभं असल्याचं या निवेदनातून सांगण्यात आलं आहे.