राज्याबाहेर गेलेल्या प्रकल्पावरून शिंदे सरकारविरोधात लालबाग परिसरात बॅनरबाजी

मुंबई – वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पानंतर (Vedanta-Foxconn project) आता आणखी एक प्रकल्प गुजरातला गेला आहे. नागपूरला होणारा C-295 लष्करी ट्रान्सफोर्ट एअरक्राफ्ट प्रकल्प गुजरातमधील वडोदरा येथे होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते 30 ऑक्टोबर रोजी वडोदरा येथे या प्रकल्पाचे भूमिपूजन होणार आहे. यावरून राज्यात आरोप-प्रत्योरापाच्या फैरी झडत आहेत. वेदांता-फॉक्सकॉन, बल्क ड्रग्ज पार्क(Bulk Drugs Park) या दोन प्रकल्पानंतर तिसरा प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारवर चहुबाजूने टीका सुरू झाली आहे.

दरम्यान, यातच आता लालबाग परिसरात ठाकरे गटाकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. राज्याबाहेर गेलेल्या प्रकल्पासंदर्भात ठाकरे गटाकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. या बॅनरवर महाराष्ट्रातून (Maharashtra) गुजरातला (Gujarat) आतापर्यंत हलवण्यात आलेल्या सर्व प्रकल्पांची यादीच देण्यात आली आहे. केवळ यादीच नाही तर ते कोणत्या शहरात हलवण्यात आले त्या शहराचे नाव देखील देण्यात आलं आहे. मुंबईसह महाराष्ट्राची तरुणाई विचारतेय यासाठीच बदल हवाय का? असा टोला या बॅनरच्या माध्यमातून शिंदे, फडणवीस सरकारला लगावला आहे.