मराठा मंत्र्यांना समाजात तोंड दाखवायला जागा नाही, विखे पाटलांचा प्रहार

मुंबई : मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर मराठा समाजाने राज्य शासनाकडे केलेल्या मागण्या ह्या १७ जून २०२१ रोजी मुंबई येथे झालेल्या बैठकीत राज्य शासनाने मान्य केल्या होत्या. मात्र आठ महिने उलटले तरी अजूनही त्या मागण्यांवर राज्य शासनाने कोणतीच अंमलबजावणी केलेली नाही. ठाकरे सरकारकडून होत असलेल्या फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजात आता असंतोष वाढू लागल्याचे चित्र आहे.

दरम्यान, मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी खासदार संभाजीराजे छत्रपती हे २६ फेब्रुवारीपासून मुंबई येथे आझाद मैदानावर आमरण उपोषणास बसले आहेत. खरतर मराठा समाजाच्या मागण्या 15 दिवसात मंजूर करतो म्हणून सरकारने सांगितलं होतं. पण आजतागायत त्यावर तोडगा निघाला नाही. त्यानंतर रायगड आणि नांदेडला आंदोलन करूनही सरकारने त्याची दखल घेतली नाही. सरकारने शब्द पाळला नसल्याचे चित्र आहे.

यावर आता भाजप नेते आणि आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया देत सरकारमधील मराठा समाजातील मंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे. संभाजी छत्रपती यांनी ज्या मागण्या केल्या आहेत त्याबाबत एकाही आश्वासनाची सरकारने पू्र्तता केलेली नाही. मराठा मंत्र्यांनी समाजाचा विश्वासघात केलाय. त्यांनी जनाची नाही तर मनाची लाज ठेवावी,अशी टीका विखे पाटील यांनी केलीय. मराठा मंत्र्यांना समाजात तोंड दाखवायला जागा नाही. त्यामुळे त्यांनी राजीनामे देवून समाजाच्या प्रश्नासोबत आहोत हे दाखवून द्यायला हवं, असं म्हटलंय.