किती खोटं बोलायचं याला काही मर्यादा असतात, आदित्य ठाकरेंच्या टीकेला उदय सामंतांनी दिलं प्रत्युत्तर

मुंबई : वेदान्त-फॉक्सकॉन(Vedanta-Foxconn) आणि टाटा एअरबस(Tata Airbus) हे दोन मोठे प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. यावरून विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यात येत आहेत. दरम्यान आज या मुद्द्यावरून आदित्य ठाकरे आणि माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी पत्रकार परिषद घेत शिंदे सरकारवर टीका केली होती. राज्यातील प्रकल्प बाहेर जात असताना मुख्यमंत्री उद्योगमंत्र्यांचा राजीनामा घेतील का? असे ते म्हणाले होते. या टीकेला उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिले आहे.

काय म्हणाले उदय सामंत?

”मी काल पत्रकार परिषद घेऊन टाटा एअरबसबरोबर तत्कालिन सरकारने जो पत्रव्यवहार केला असेल किंवा बोलणी झाली असेल त्याचा तपशील जाहीर करावा, अशी विनंती केली होती. माझ्या विनंतीला मान देऊन माजी उद्योगमंत्री आणि आमदार आदित्य ठाकरे आज काही कागदपत्रं जाहीर करतील, असं वाटलं होतं. मात्र, आज मीच काही कागदपत्र घेऊन महाराष्ट्राच्या जनेतपुढे आलो आहे”, अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली आहे.

”मिहानमध्ये टाटाची एक कंपनी कार्यरत आहे. त्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी २०२० मध्ये पुढाकार घेऊन एअरबससाठी लागणारी जागा मिहानमध्ये मिळेल का? अशा पद्धतीची चौकशी केली होती. त्यानंतर हा प्रकल्प महाराष्ट्रात यावा, यासाठी कोणताही प्रयत्न तत्कालिन राज्य सरकारकडून झाला नाही. याउलट विरोधीपक्ष नेते असताना देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रकल्प मिहानमध्ये येण्यासाठी प्रयत्न केला होते. मात्र, राज्य सरकारकडून कोणताही प्रतिसाद देण्यात आला नाही. त्यामुळे सरकार गेल्यानंतर त्यांना राग असू शकतो. मात्र, राग असला तरी किती खोटं बोलायचं याला काही मर्यादा असतात, असे प्रत्युत्तर उदय सामंत यांनी दिले आहे. एअरबसच्या हा प्रकल्प नागपूरच्या मिहानमध्ये होणार, असा कोणताही निर्णय झाला नव्हता”, असेही ते म्हणाले.

”तत्कालिन महाविकास आघाडी सरकारच्या काळात ७२ एमओयू करण्यात आले होते. मात्र, ते कागदावरच राहिले. त्यासाठी कोणतीही कॅबिनेट बैठक घेण्यात आली नाही. मात्र, आम्ही तीन महिन्यात १० कंपन्यांसाठी कॅबिनेट बैठक घेऊन २५ हजार ३६८ कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मान्यता दिली”, अशी माहितीही त्यांनी दिली. ”बल्क ड्रग्जच्या बाबतीतही जे आरोप करण्यात आले, ते खोटे आहेत. हा प्रकल्प आम्ही रायडमध्येच करतो आहे. एमआयडीसीच्या माध्यमातून हे प्रकल्प उभारण्यात येत आहे”, असं स्पष्टीकरणही त्यांनी दिले.

”ऑरीक सिटीच्याबाबतीतही आज जे आरोप आदित्य ठाकरे यांनी केले, ते खोटे आहेत. या सिटीपासून ९०० मीटरवर समृद्ध महामार्ग आहे. गेल्या अडीच वर्षांपासून तिथे लोक सांगत आहेत की, हा ९०० मीटरचा रस्ता करा. मात्र, त्याकडे कोणालाही लक्ष द्यायला वेळ मिळाला नाही. पण आम्ही तो रस्ता मंजूर केला. हा प्रकल्पही राज्यातून गेला नाही. फक्त केंद्र सरकारकडून जो निधी येणार होता. तो अद्यापर्यंत आलेला नाही. आम्ही त्यासाठी पाठपुरावा करू. मात्र, येथे होणारा मेडीकल डिव्हाईस प्रकल्पही तिथेच होईल”, असेही ते म्हणाले.