रुपाली पाटलांची ‘मनसे’ भूमिका, अजितदादांकडे केली ‘ही’ मागणी

पुणे : राज्यातील सर्व दुकाने व आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेमध्ये असावेत असा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असून या संदर्भात महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम, 2017 मध्ये सुधारणा करण्यात येईल.

कामगार संख्या 10 पेक्षा कमी असलेल्या आस्थापना तसेच 10 पेक्षा अधिक असलेल्या आस्थापना, अशा सर्व आस्थापना, देवनागरी लिपीत मराठी भाषेमध्ये नामफलक प्रदर्शित करतील. मालक आस्थापनेचा नामफलक हा मराठी देवनागरी लिपी बरोबरच इतर भाषेतही लिहू शकतो.

ठाकरे सरकारच्या या निर्णयानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक पत्र काढून या निर्णयाचे खरे श्रेय हे महाराष्ट्र सैनिकांचे असल्याचे ठासून सांगितले आहे. तर महाराष्ट्र फक्त फक्त मराठीच चालणार याची आठवण आम्हाला पुन्हा पुन्हा करायला लावू नका. असा थेट इशाराच राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीला दिला आहे.

दरम्यान, या महाराष्ट्र दुकानावर मराठीतच पाट्या असाव्यात यासाठी खरतर आंदोलन करूच लागू नये. परंतु २००८,२००९ साली पाट्या मराठीतच असाव्यात यासाठी महाराष्ट्र सैनिकांनी महाराष्ट्र जागवला, आंदोलनं केली, शेकडोंनी केसेस अंगावर घेतल्या आणि शिक्षा भोगल्या. असं राज ठाकरे आपल्या पत्रात म्हणाले आहेत.

त्यानंतर आता मनसे मधून नुकत्याच राष्ट्रवादीत डेरेदाखल झालेल्या डॅशिंग नेत्या रुपाली पाटील यांनी ‘मनसे’पूरक भूमिका घेतली आहे. ‘दुकानावरील पाट्या मराठीत करण्याच्या महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत ! पण या साठी आंदोलनात ज्यांनी माय मराठीसाठी गुन्हे अंगावर घेतले ते सर्व गुन्हे मागे घेण्यात यावेत.’ अशी मागणी रुपाली पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे केली आहे. त्यामुळे रुपाली पाटलांच्या या ‘मनसे’ मागणीला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं औत्सुक्याचे आहे.