मनातील कथा प्रेक्षकांसमोर ठेवण्यासाठी चित्रपट हे प्रभावी माध्यम ; दिग्दर्शकांनी व्यक्त केल्या भावना

पुणे : आयुष्यातील एखादी घटना मनात कोरून राहते. आपल्या मनात त्याची कथा तयार होते. हीच कथा प्रेक्षकांसमोर आणायची असेल तर, चित्रपट हे प्रभावी माध्यम असून, याच माध्यमातून आम्ही आमची गोष्ट सांगायचा पहिला प्रयत्न केला आहे. असे मत चित्रपट दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलेल्या दिग्दर्शकांनी व्यक्त केले.

पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या वतीने सुरू असलेल्या १९ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाअंतर्गत लॉ कॉलेज रस्त्यावरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे ‘कँडिड टॉक्स’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे कलात्मक संचालक समर नखाते यांनी आज ‘पिग’, ‘पिंकी एली?’ आणि कंदील या चित्रपटांच्या दिग्दर्शकांशी संवाद साधला. ‘पिग’ या तमिळ चित्रपटाचे दिग्दर्शक थमीज, ‘पिंकी एली?’ या कानडी चित्रपटाचे कला दिग्दर्शक रामचंद्र होसूर, ‘कंदील’ या मराटी चित्रपटाचे दिग्दर्शक व निर्माते महेश कंद आदी यावेळी उपस्थित होते.

‘पिग’ हा चित्रपट ग्रामीण भागातील जातीव्यवस्थेवर भाष्य करणारा आहे असे सांगत दिग्दर्शक थमीज म्हणाले, “खालच्या जातीतील आजोबा व नातू यांचे नाते उलगडत असताना समाजातील जातीव्यवस्था व भेदभावांवर बोट ठेवण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. तामिळनाडूमध्ये उच्च जातीमध्ये कोंबडी, शेळीचे मांस खाण्याची तर तुलनेने खालच्या जातीत डुक्कराचे मांस खाण्याची पद्धत आहे. मात्र एका उच्च जातीतील व्यक्तीला डुक्कराचे मांस खाण्याची इच्छा होते. ते तयार करण्याची जबाबदारी खालच्या जातीतील आजोबा आणि नातवावर पडते. हे जेवण बनत असताना घडणा-या घटना चित्रपटात दाखविल्या आहेत.”

जेवण, खाद्यसंस्कृती ही सर्व जाती धर्मातील व्यक्तीना एकत्र आणते असे म्हटले जाते. मात्र, एखाद्या व्यक्तीचा फाजील आत्मविश्वास या मध्ये आला तर काय होते, याचे चित्रण चित्रपटात मांडण्यात आले आहे. नुकत्याच लॉस एंजेलिस येथे झालेल्या चित्रपट महोत्सवात या चित्रपटाला ग्रँड ज्युरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे चित्रपटात काम केलेल्या सर्वांनीच पहिल्यांदा कॅमे-यासमोर अभिनय केला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक चित्रपट बनवायचे म्हणून घर सोडून चेन्नई शहरात आहे. त्यांनी दहा वर्षे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून अनेक दिग्दर्शकांसोबत काम केले. दिग्दर्शनाचे कोणत्याही औपचारिक शिक्षण न घेता सुरू असलेला त्यांना हा प्रवास प्रेरणादायी असल्याचे मत समर नखाते यांनी व्यक्त केले. आणखी एक विशेष बाब म्हणजे या चित्रपटासाठी त्यांनी तब्बल पाच ड्राफ्ट लिहिले.

स्त्रिया आणि लहान मूल यांच्यामधील भावनिक नातेसंबंधांवर प्रकाश टाकणा-या ‘पिंकी एली?’ अर्थात ‘व्हेअर इज पिंकी’ या चित्रपटाचे कला दिग्दर्शक रामचंद्र होसूर म्हणाले, “चित्रपटाची कथा ही सत्य घटनेवर आधारित आहे. एका बातमीवर संशोधन करीत ही गोष्ट साकारण्यात आली असून हरवलेल्या लहान बाळाचा अर्थात पिंकीचा प्रवास यामध्ये चित्रित केला आहे. मुले हरविल्यानंतर केवळ पोलिसात तक्रार होते. मात्र त्या मूलाचा संपूर्ण प्रवास व मानवी मनाचे कंगोरे उलगडणार हा चित्रपट आहे.” सोळा दिवसांत बंगळूरू शहरात याचे चित्रकरण पूर्ण करण्यात आले असून दिग्दर्शकाने आपल्या गोष्टीनुसार ठिकाणे निवडण्याचा आणि शहराचे एक वेगळे अंग दाखविण्याचा प्रयत्न केला असल्याचेही होसूर यांनी नमूद केले.

‘कंदील’ या मराठी चित्रपटाबद्दल सांगताना दिग्दर्शक महेश कंद म्हणाले, “१५ वर्षांपासून उरात असलेले स्वप्न या चित्रपटाच्या माध्यमातून पूर्ण झाले. चित्रपटासाठी मुंबईतील धारावीसोबतच पिंपरी चिंचवड व जनता वसाहत या ठिकाणी असलेल्या झोपडपट्टीतील प्रत्येक घरनंघर पाहिले. समाजातील वास्तव ‘जसं आहे तसं’ या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. झोपडपट्टीत राहणारी पाच मुले एका अतरंगी बाबाच्या सांगण्यावरून कसे वागतात. बाबाने सांगितलेल्या मार्गावर कंदील घेऊन चालत ते त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचतात का, याचा प्रवास चित्रपटात पाहायला मिळणार आहे. जीवनातील आशा, निराशा आणि त्यांमधील हिंदोळा याद्वारे समोर आणण्याचा प्रयत्न आहे. आपण चित्रपट बनवीत नसतो, तर चित्रपट आपल्याला बनवतो याचा अनुभव यावेळी आला असे मत कंद यांनी आवर्जून व्यक्त केले.