रंगावलीतून अवतरले श्री तिरुपती बालाजी जीवनचरित्र

श्रीरंग कलादर्पण फाऊंडेशनतर्फे भव्य रंगावली प्रदर्शन: मॅजिकल,थ्रीडी, हलती रांगोळी प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण

पुणे : महालक्ष्मी माता वैकुंठ सोडून गेल्यावर त्यांच्या शोधत निघालेले भगवान विष्णू… वारुळात स्थित असलेल्या भगवान विष्णू यांना गायीने दिलेले दूध… व्यंकटेश व पद्मावती मातेच्या भव्य विवाह सोहळ्याची साकारलेली रंगावली… व्यंकटेशाने कुबेराकडून घेतलेले कर्ज… अश्या एकाहून एक सरस रंगावलीतून पुणेकरांना श्री तिरुपती बालाजी जीवनचरित्र पहायला मिळाले. त्याचबरोबर हलती रांगोळी, ३ डी गॉगल घालून पहायची रांगोळी, २ इन १ रांगोळी, प्रतिबिंब रांगोळी, पाण्यावरची, पाण्याखालची आणि पाण्याच्या मधोमध असलेली रांगोळी प्रदर्शनाचे खास आकर्षण ठरत आहे.

श्रीरंग कलादर्पण फाऊंडेशनच्यावतीने श्री तिरुपती बालाजींच्या चरित्रावर आधारित रंगावली प्रदर्शन बालगंधर्व कलादालनात आयोजित करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन अभिनेत्री अक्षया जोशी आणि हार्दिक जोशी यांच्या हस्ते झाले. यावेळी पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ, ज्येष्ठ रांगोळीकार जगदीश चव्हाण, श्रीरंग कलादर्पण फाऊंडेशनचे संस्थापक प्रा. अक्षय शहापूरकर व इतर मान्यवर उपस्थित होते. या प्रदर्शनात तब्बल १०० रंगावली साकारण्यात आल्या आहेत.

प्रदर्शनात सिंधुदुर्गातील रांगोळी कलावंत समीर चांदरकर यांचा श्रीरंग कलागौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. हे प्रदर्शन दिनांक २९ जानेवारी पर्यंत दररोज सकाळी ९ ते रात्री ९ यावेळेत विनामूल्य खुले आहे.