महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा, साताऱ्यातील प्रवीण निकमचा लंडनमध्ये सन्मान

पुणे : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त प्रभावशाली काम करणाऱ्या प्रतिभावान देशातील 75 युवकांचा सन्मान ब्रिटिश कौन्सिल व नेशनल इंडियन स्टुडंट अँड अलूमनी युनियन (British Council and National Indian Students and Alumni Union)माध्यमातून लंडन येथे करण्यात आला. यामध्ये महाराष्ट्रातील प्रवीण निकम (Praveen Nikam)  याचा सन्मान करण्यात आला आहे. काल प्रजासत्ताक दिनानिमित्त लंडन येथे हा सन्मान करण्यात आला. लंडनमध्ये उच्च शिक्षण घेतल्यांनंतर प्रवीण सध्या समता सेंटर (Samata Center) या संस्थेच्या माध्यमातून उच्च शिक्षणासाठी काम करत आहे. महाराष्ट्रातून प्रवीण निकम यांच्यासह चैतन्य मारपकवार, राजू केंद्रे, विवेक गुरव (Chaitanya Marpakwar, Raju Kendra, Vivek Gurav) यांचा सन्मान लंडन येथे करण्यात आला आहे.

शिक्षक प्रशिक्षण, दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण संधीचे मार्गदर्शन, ५३ देशांच्या समिती असणाऱ्या राष्ट्रकुलचा प्रतिनिधी म्हणून काम आदींची दखल ब्रिटिश काऊंसील व नेशनल इंडियन स्टुडंट अँड अलूमनी युनियन यांनी घेतली.भारताचे निवडणूक आयोगाचे माजी आयुक्त डॉ. एस.वाय. कुरेशी, ब्रिटिश काऊंसील शिक्षण विभाग संचालिका ऋतिका पारुक, ऑक्सफर्ड फेलो शाहीद जमील, रीडिंग विद्यपीठ कुलगुरू पाल इनमन, विद्यापीठ संघटनेतील प्रमुख कार्यकारी अधिकारी विविनी स्टर्न (Former Commissioner of Election Commission of India Dr. S.Y. Qureshi, British Council Director of Education Ritika Parook, Oxford Fellow Shahid Jameel, Reading University Vice-Chancellor Paul Inman, University Organization Chief Executive Vivini Stern) या परीक्षकांनी भारतातील ब्रिटन मध्ये शिक्षण घेतलेल्या ७५ युवकांची निवड पुरस्कारासाठी केली आहे. या सर्व ७५ युवकांना लंडन येथे सन्मानित करण्यात आले.‘प्रविणचीही’ निवड झाली होती. ब्रिटिश कॉन्सिल, ब्रिटिश सरकारच्या उच्च-शिक्षण विभाग आणि युके राष्ट्रीय विद्यार्थी संघटनेच्या यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या ७५ वर्षात ब्रिटन मध्ये शिकलेल्या भारतातील ७५ माजी विद्यार्थी ज्यांचं वेगेवेगळ्या क्षेत्रांत ठसा आहे, त्यांचा ह्या ठिकाणी सत्कार करण्यात आला आहे, सदर अवार्ड मध्ये अभिनेत्री परिणीती चोप्रा, राज्यसभा सदस्य राघव चड्डा, आदर पूनावाला (Actress Parineeti Chopra, Rajya Sabha Member Raghav Chadha, Aadhar Poonawala)  इत्यादी प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वाचा समावेश आहे.

मूळ साताऱ्यातील आसू पवारवाडीतील (Asu Pawarwadi in Satara) असणारे प्रवीण यांचे वडील नोकरीसाठी शेती सोडून पिंपरी-चिंचवडला स्थायिक झाले. वडील पिंपरीतील एका कंपनीत कामगार तर आई गृहिणी. आर्थिक संकटांना न घाबरता, दिवाळीतील उटणे, फिनेल विकून, जोडधंदे करून आपल्या मुलांचे शिक्षण चालू ठेवलं. पिंपरी-चिंचवडच्या कामगार वसाहतीत जेमतेम परिस्थितीत लहानाचा मोठा झालेल्या एका तरुणाने नामांकित चेवेनिंग शिष्यवृत्तीच्या माध्यमातून शिक्षणासाठी थेट लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सपर्यंत गरुडझेप घेतली.

परदेशातील उच्च शिक्षण पूर्ण करून सहजासहजी मिळणारी मोठ्या पगाराची नोकरी न स्वीकारता भारतात पूर्णवेळ ग्रामीण आणि वंचित बहुजन समाजातील तरुणाईला उच्च शिक्षणाच्या माध्यमातून सक्षम करण्यासाठी त्याने समता केंद्राची स्थापना केली. समता केंद्र ही नुसती शिक्षणावर काम करणारी संस्था नाही तर नेतृत्व, कौशल्य निर्माण करणार एक केंद्र बनत आहे. योग्य मार्गदर्शनाअभावी विद्यार्थ्यांना चांगल्या विद्यापीठांमध्ये अर्ज करता येत नाहीत. आर्थिक अडचणी किंवा प्रवेश प्रक्रिया किंवा शिष्यवृत्तीची माहीत नसते. हीच असमानता ज्ञानाने दूर करून प्रतिष्ठित विद्यापीठांमध्ये बहुजन तृतीयपंथी व दुर्बल तरुणाईला प्रतिनिधित्व कसं मिळेल यासाठी समता सेंटर काम करत आहे. कौशल्य विकास कार्यक्रमही राबवत आहे. तळागाळातील विद्यार्थ्यांना शिक्षणातील विषमता संपवून भारत आणि जागतिक प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांमध्ये प्रतिनिधित्व मिळावे आणि भारतातील शिक्षकांचा क्षमता विकास या दोन पातळीवर रचनात्मक काम तो करीत आहे.

यावर्षी प्रवीणच्या मार्गदर्शनातून अहमदनगरमधील डॉ. ह्रषीकेश आंधळकर, चंद्रपूरचे दीपक चटप, पुण्याचे वैभव वाळुंज (Dr. Hrshikesh Andhalkar, Deepak Chatap of Chandrapur, Vaibhav Walunj of Pune) लंडनमध्ये पदव्युत्तर शिक्षण तर सोलापूरचे किरण माने (Kiran Mane )नेदरलँड मध्ये पदव्युत्तर शिक्षण संपूर्ण शिष्यवृत्ती वर करत आहे. इतकेच नव्हे तर या आधी शेकडो शिक्षकांना त्याने प्रशिक्षण दिले आहे.

याआधी नेहरू युवा केंद्र व राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून प्राविणने युवकांचे समाजाभिमुख संघटन उभे केले. यासाठी त्याला भारत सरकारचा प्रतिष्ठित राष्ट्रीय युवा पुरस्कार मिळाला आहे. २०१६ मध्ये डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ झांबियाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राष्ट्रकुल निवडणूक निरीक्षक म्हणूनही त्याने काम केले, हे विशेष. संयुक्त राष्ट्राचे उपमहासचिव अमिना मोहंमद आणि नॉर्वेच्या पंतप्रधान एर्ना सोलबर्ग यांनी त्यांच्या सार्वजनिक भाषणांमध्ये प्रवीणच्या कार्याचे कौतुक केले आहे.गेल्या १० वर्षांपासून सातत्याने कार्यरत असलेल्या प्रवीणचा लंडनमध्ये होणारा गौरव ही बाब महाराष्ट्रासाठी निश्चितच अभिमानास्पद ठरते.

या सन्मानानंतर बोलताना प्रवीण निकम म्हणाला की,आजवर आपल्या वस्त्या आणि तांड्यावर चालवलेले डीस्कोर्स संशोधन आणि साहित्यातून जागतिक अकादमिक पटलावर मांडण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न अम्ही समता सेंटर च्या माध्यमातून करत आहोत. या उपक्रमाला संस्थेची जोड देत वर्धिंगत करण्याचा प्रयत्न आहे. हा पुरस्कार मी वंचित समुदायांना अर्पण करतो. शिक्षक, युवक आणि स्वयंसेवी संस्था या समाजात बदल घडवणाऱ्या सिस्टम लीडर्स बरोबर काम करत राहणं आणि एक पूर्णवेळ संशोधन केंद्र ऊभे रहावा म्हणून केलेला पर्यंत म्हणजे समता सेंटर.