लसीकरणाची मोहीम झाल्यानंतर नागरी सुधारणा कायदा अंमलात आणणार – अमित शाह

नवी दिल्ली – लसीकरणाची मोहीम झाल्यानंतर नागरी सुधारणा कायदा अंमलात आणणार असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्पष्ट केलं. पश्चिम बंगालमधील भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांनी काल (2 ऑगस्ट) शाह यांची भेट घेतली आणि या कायद्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याची विनंती केली. तेव्हा अमित शाह यांनी ही बाब स्पष्ट केली.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार नागरी सुधारणा कायदा हा मुस्लिम नागरिकांच्या विरोधात असल्याचा आरोप केला जातो. मात्र पश्चिम बंगालसारख्या राज्यात हा कायदा फार महत्त्वाचा आहे कारण पश्चिम बंगालमध्ये बांग्लादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातून अनेक लोक येत असतात.

नागरी सुधारणा कायद्यानुसार 31 डिसेंबर 2014 नंतर पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधून आलेल्या लोकांना भारताचं नागरिकत्व मिळणार नाही. संसदेने हा कायदा 2019 मध्ये मंजूर केला होता आणि त्याला देशभरातून मोठा विरोध झाला होता.