भाजप नेत्यांनीही रस्त्याला टिपू सुलतान नाव दिलंय, फडणवीस त्यांचा राजीनामा घेणार?

मुंबई : मुंबईतील मालाड परिसरात नव्याने बांधण्यात आलेल्या क्रीडांगणाच्या नामकरणावरून संघर्षाला सुरुवात झाली आहे. मालाडचे स्थानिक आमदार आणि महाराष्ट्र सरकारमधील मंत्री अस्लम शेख यांनी त्यांच्या स्वनिधीतून खेळासाठी मैदान बांधले, ज्याचे नाव टिपू सुलतान मैदान असे केले आहे. मात्र टिपू सुलतानच्या मैदानाला नाव देण्यास भाजपचा विरोध आहे.

टिपू सुलतानने आपल्या कारकिर्दीत हिंदूंवर अत्याचार करून जबरदस्तीने धर्मांतर केले यामुळेच भारतीय जनता पक्ष आणि हिंदू संघटनांकडून या नावाला विरोध होत आहे. टिपू सुलतानच्या नावाने शिवसेनेला लक्ष्य करण्याची संधी भाजपला मिळाली आहे. स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवून घेणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी असे नामकरण कसे करू दिले, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर अस्लम शेख यांनी मीडियाला प्रतिक्रिया देताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर टीका केली आहे. भाजपने रस्त्यांना टिपू सुलतान नाव दिलं, आता भाजप केवळ निवडणुका आल्यात म्हणून राजकारण करत आहे. ज्या भाजप नेत्यांनी रस्त्यांना वीर टिपू सुलतान नाव दिलं, त्या भाजप नेत्यांचा फडणवीस राजीनामा घेणार का? असा सवाल अस्लम शेख यांनी फडणवीसांना विचारला आहे. आता भाजपच्या पोटात अचानक का दुखू लागले? असाही सवाल त्यांनी विचारला आहे.

जर फडणवीसांनी प्रस्ताव ठेवणाऱ्या नगरसेवकाचा आणि मंजुरी देणाऱ्या आमदाराचा राजीनामा घेतला तरच त्यांची नियत साफ असेल, अन्यथा त्यांची नियत साफ नाही असेही अस्लम शेख म्हणाले आहेत. येत्या महापालिका निवडणुका जिंकण्यासाठी भाजप कोणत्याही थरला जात आहे, असा निशाणा त्यांनी भाजपवर साधला आहे. तसेच मुंबई महापालिकेच्या नियमानुसान एकदा कुठेही कुणाचेही नाव दिले ते हटवता येत नाही, असेही त्यांनी सांगितले आहे.