सामान्य माणसात पोलिसांबाबत विश्वास आणि गुंडांना दहशत बसेल असे प्रभावी काम व्हावे – देसाई

वाशिम – वाशिम जिल्हा लहान असला तरी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम पोलिसांना करायचे आहे. पोलीस अधीक्षक बच्चन सिंह हे कल्पकतेतून काम करीत असून विविध उपक्रम ते जिल्ह्यात राबवित आहे.भविष्यात देखील आणखी चांगल्या प्रकारचे उपक्रम वाशिम पोलीस दलाच्या माध्यमातून राबविण्यात यावे. सामान्य माणसाला पोलिसांबाबत विश्वास निर्माण करून आणि गुंडांना दहशत बसेल असे प्रभावी काम वाशिम पोलीस दलाने करावे. असे प्रतिपादन पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.

आज २६ जानेवारी रोजी पालकमंत्री श्री. देसाई यांनी पोलिस अधीक्षक कार्यालय भेट दिली.यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे,आमदार ऍड.किरणराव सरनाईक, आमदार अमित झनक,जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत,जि.प.अर्थ व बांधकाम समिती सभापती सुरेश मापारी यांची उपस्थिती होती.पोलीस अधीक्षक कार्यालयात पालकमंत्री देसाई यांचे आगमन प्रसंगी पोलीस अधिक्षक श्री.बच्चन सिंह यांनी स्वागत केले.

पालकमंत्री देसाई यांनी भेटीदरम्यान डायल ११२ नियंत्रण कक्षाची पाहणी करून नियंत्रण कक्षातून करण्यात येणाऱ्या कामकाजाची माहिती घेतली. आयोजित एका कार्यक्रमात जिल्हा पोलीस दलाने केलेल्या कार्याचे सादरीकरण श्री.देसाई यांनी बघितले. यावेळी वाशिम पोलीस दलातील वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांनी भेटवस्तू व गौरव चिन्ह देऊन सन्मानित केले.

देसाई म्हणाले, वाशिम पोलिस दलाने चांगले काम केल्याचे सादरीकरणातून दिसून येत आहे.मार्च २०२० मध्ये कोरोनाची पहिली लाट आली असता लॉकडाउनमध्ये सर्वाधिक ताण पोलीस व महसूल विभागावर होता. पहिल्या लाटेत पोलीस अधिकारी व कर्मचारी बाधित होण्याचे प्रमाण वाढले होते. १८ तास पोलिस कर्मचारी काम करायचे. पाचशेपेक्षा जास्त पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. पोलिसांची चांगली बाजू ही लोकांपुढे फार कमी येते. पोलिसांनी आपले कर्तव्य व जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचे काम सातत्याने सुरू ठेवावे,असे ते म्हणाले.

महिला सुरक्षितता पथदर्शी प्रकल्प जिल्ह्यात सुद्धा राबविणार असल्याचे सांगून श्री देसाई म्हणाले, या प्रकल्पामुळे मुलींमध्ये सुरक्षिततेबाबत आत्मविश्वास निर्माण होतो.विशेषता कॉलेज युवतींसाठी हा प्रकल्प राबवायचा आहे. जिल्‍हा पोलीस दलाच्‍या बळकटीकरणासाठी आपण पुढाकार घेतला आहे. जिल्हा नियोजन समितीमधून वाहन खरेदीसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यावर्षी सुद्धा पोलिस दलाला वाहने उपलब्ध करून देण्यात येतील. पोलिसांच्या कामाचा व्याप बघता त्यांना चांगल्या वातावरणात राहता यावे, त्यांना चांगले घर मिळाले पाहिजे यासाठी पोलीस हाउसिंगसाठी गेल्या दोन वर्षात भरीव तरतूद केली आहे. या वर्षीसुद्धा पोलीस हाऊसिंगसाठी अर्थसंकल्पात ८०० कोटी रुपयांची तरतूद केल्याचे त्यांनी सांगितले.

देसाई पुढे म्हणाले, डायल ११२ नियंत्रण कक्षाला भेट दिली असता पोलीस विभाग तक्रारदाराच्या मदतीसाठी किती तत्पर आहे याची प्रचिती आली. नियंत्रण कक्षातून तक्रारदाराशी त्याच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधून माहिती घेतली. पाच वर्षांपूर्वीचे तक्रारदाराचे भांडण होते. शेतजमीन ज्या व्यक्तीकडून तक्रारदाराने खरेदी केली होती तो व्यक्ती शेतात गेल्यावर तक्रारदाराकडे ५ महिलांना पाठवून दमदाटी करून शेतातून हुसकावून लावण्याचे काम करीत होता.संबंधित तक्रारदाराने डायल ११२ वर संपर्क केला असता तक्रारदाराच्या मदतीसाठी पोलीस १० ते १५ मिनिटात मदतीसाठी पोहोचले. रीतसर तक्रार करायला तो व्यक्ती पोलीस स्टेशनला आल्याचे त्यांनी सांगितले.

वाशिम पोलीस दलाच्या कामगिरीची पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी सादरीकरणातून माहिती दिली. जिल्ह्यात गुन्हे उघडकीसचे प्रमाण ८१ टक्के आहे. जऊळका/रेल्वे येथील ज्येष्ठ नागरिक दुहेरी खून आणि मालेगाव येथील अंजनकर ज्वेलर्सच्या कामगाराला लुटून हत्या करणाऱ्या आरोपींना ४८ तासात अटक केली. राज्यातील सर्वात मोठी अमली पदार्थ कारवाई रिसोड पोलीस स्टेशनअंतर्गत करून ३ कोटी ४५ लाख रुपयांचा गांजा पकडून दहा आरोपींना अटक केली. एमपीडीए कायद्यांतर्गत दोन वर्षात ६ गुंडाविरुद्ध कारवाई करण्यात आली.मागील वर्षी शेवटच्या तीन महिन्यात ११ इसमाविरुद्ध तडीपारीची कारवाई करण्यात आली. २५७ अंमलदारांची प्रलंबित असलेली पदोन्नती देण्यात आली. अनुकंपा तत्त्वावर १९ व्यक्तींना नियुक्ती देण्यात आली.

नाविन्यपूर्ण उपक्रम दृष्टी प्रणालीच्या माध्यमातून सर्वसमावेशक पोलीस गस्त प्रणाली यामध्ये क्यू आर कोड पेट्रोलिंग ४४० वरून ३७०० अशी वाढ करण्यात आली. जीपीएस आधारित रात्रगस्त १४ वाहनांवरून ७८ वाहनावर लावण्यात आली. पीडित, संकटग्रस्त व्यक्तींना तात्काळ एकात्मिक सेवा देण्याच्या उद्देशाने वाशिम पोलिस दलामध्ये १६ सप्टेंबर २०२१ रोजी डायल ११२ प्रकल्प कार्यान्वित झाला. राज्यात ग्रामीण सर्व जिल्ह्यांमध्ये वाशिम प्रतिसाद वेळेमध्ये (२० मिनिटांपेक्षा कमी) प्रथम क्रमांकावर आहे.आजपर्यंत ९७२ कॉल आले. सर्व पीडित व्यक्तींना मदत पोहोचविण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक यांनी दिली. विना हेल्मेट ६४५७ केसेस करण्यात आल्या. त्यामधून ३२ लाख २८ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. वाशिम घटकातील ५४ तक्रारदारांना एक कोटी एक लक्ष रुपयांचा मुद्देमाल डिसेंबर महिन्यामध्ये परत करण्यात आला. अशी माहिती पोलीस अधीक्षक यांनी आपल्या सादरीकरणातून दिली. कार्यक्रमाला अप्पर पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्यासह अन्य पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.