गृहमंत्री महाराष्ट्रात आले तर संजय राऊतांच्या पोटात गोळा का उठतो?, भाजपा प्रवक्ता राम कुलकर्णींचा सवाल

देशाचे गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) महाराष्ट्राच्या दौर्‍यावर आल्यानंतर खा. संजय राऊतांच्या (Sanjay Raut) पोटात गोळा का उठतो?असा सवाल भाजपा राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी (Ram Kulkarni) यांनी केला असुन ज्या गृहमंत्र्यांनी 370 कलम हाटवण्यासाठी हिंमतीनं पुढाकार घेतला त्यांच्याबाबत ब्र शब्द काढण्याची राऊतांमध्ये पात्रता तरी आहे काय? असा टोला त्यांनी लावत राऊतांनी बालिशपणाचं राजकारण सोडुन देण्याचा सल्ला कुलकर्णींनी दिला.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, देशाचे गृहमंत्री अमित भाई शहा यांच्या नागपूर दौर्‍यावर ठाकरे शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते संजय राऊतांनी प्रश्नचिन्ह निर्माण करताना सोंगट्या आणि गोट्या हालवण्यासाठी आल्याचा उल्लेख त्यांनी केला. त्याला उत्तर देताना प्रवक्ता राम कुलकर्णी यांनी म्हटले अमितभाई शहा देशाचे गृहमंत्री असुन 60 वर्षापासून जो प्रश्न कुणीच मार्गी लावला नाही ते काश्मिरमधील 370 कलम हाटवण्यासाठी शहा यांचा पुढाकार कमालीचा राहिला. खरं तर स्व.बाळासाहेब ठाकरे आज असते तर त्यांनी वेळोवेळी गृहमंत्र्यांचं स्वागत केलं असतं. कारण तशा प्रकारची राष्ट्रीय कामगिरी त्यांनी बजावुन ठेवलेली आहे. पण ज्या संजय राऊतांना बालिश राजकारण करायची सवय लागलेली असून ज्यांच्या राजकिय भुमिकेत केवळ द्वेषाचं राजकारण भिनलं असुन आरोप-प्रत्यारोप करणं आणि संतुलन ढासळल्यासारखं बोलत रहाणं त्यांना गृहमंत्र्यांच्या कामगिरीची किंमत कशी कळणार? असा सवाल त्यांनी केला.

वास्तविक पहाता देशाच्या गृहमंत्र्याचं लक्ष्य महाराष्ट्रावर असणं हे खर्‍या अर्थाने भुषणावह म्हणावे लागेल. विविध सामाजिक कार्यासाठी, संघटनात्मक कार्यासाठी आणि विकासाला चालना देण्यासाठी अमितभाई शहा राज्यात येत असतात. विशेष म्हणजे केंद्रात आणि राज्यात एका विचाराचं असलेले सरकार विकासाच्या प्रश्नाला आणि राज्याच्या हिताच्या दृष्टीने अनुकुल असतं. पण गृहमंत्री राज्यात आले की राऊतांच्या छातीत धडकी बसणं साहजिकच आहे. कारण तशा प्रकारचे राजकिय चमत्कार देखील अमित भाई शहा करण्यात मागे राहिलेले नाहीत ज्याचा अनुभव संजय राऊतांच्या पक्षालासुद्धा आहे. कदाचित त्यांचा दौरा आला की राऊतांना धडधड वाटतं. म्हणून त्यांच्या पोटात गोळा उठत असावा या शब्दांत कुलकर्णींनी राऊताचा समाचार घेतला.