१९८४च्या निवडणुकीत जेमतेम अडीच हजार मतं, वाचा पुढे एक भंगारवाला कसा झाला मंत्री !

मुंबई : नवाब मलिक हे गेल्या काही महिन्यांपासून राज्याच्या राजकारणांतिक केंद्रबिंदू ठरत आहेत. NCB विरोधात छेडलेली लढाई असो व इतर केंद्रीय तपास यंत्रांना शिंगावर घेणं असो नवाब मलिक नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. आता मुंबईत आणि लगतच्या परिसरात ईडीनं काही दिवसांपूर्वी छापेमारी केली होती. ईडीच्या रडारवर डॉन दाऊद इब्राहीमची मुंबईतली मालमत्ता आणि त्या संपत्तीशी निगडीत व्यवहार करणारे काही नेतेमंडळी ईडीच्या रडारवर होते. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानंतर ईडीने ही कारवाई सुरू केली. त्यात चौकशीसाठी आता नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे.

आज राज्याचे लक्ष असलेला हा नेता अगदी शून्यातून उभा राहिला आहे. १९८४ ची गोष्ट आहे. देशात लोकसभा निवडणूक होत होत्या. ईशान्य मुंबई मतदारसंघात काँग्रेसचे गुरुदास कामत आणि भाजपचे प्रमोद महाजन या दोन दिग्गजांची जोरदार टक्कर सुरू होती. गुरुदास कामत यांना या निवडणुकीत 2 लाख 73 हजारांपेक्षा जास्त मतं मिळाली आणि ते सुमारे 95 हजार मताधिक्क्याने विजयी झाले. याच निवडणुकीत एक 25 वर्षांचा एक तरुणही नशीब आजमावत होता. कामत यांच्या विरोधात त्याला कशीबशी फक्त 2620 मतं मिळवता आली. त्या उमेदवाराचं नाव होत नवाब मलिक.

नवाब मलिक यांचं कुटुंब मूळचं उत्तर प्रदेशचं. तिथं त्यांची शेती आणि इतर व्यवसाय होते. आर्थिक स्थितीही ठिकठाक होती. नवाब यांचे वडील मोहम्मद इस्लाम मलिक हे त्यांच्या जन्मापूर्वीच मुंबईत स्थायिक झाले. पण पहिल्या अपत्याच्या बाळंतपणासाठी म्हणून ते पुन्हा उत्तर प्रदेशात गेले. आईच्या माहेरी म्हणजेच उत्तर प्रदेशातील बलरामपूर जिल्ह्यातील उतरौला तालुक्यात दुसवा गावात 20 जून 1959 ला नवाब यांचा जन्म झाला. त्यानंतर मलिक कुटुंब पुन्हा मुंबईला परतलं. मुंबईत मलिक कुटुंबांचे लहान-मोठे व्यवसाय होते. त्यांच्या मालकीचं एक हॉटेल होतं. त्याव्यतिरिक्त भंगार व्यवसाय आणि इतर काही कामं ते करायचे. मुंबईत दाखल झाल्यानंतर सुरुवातीपासूनच मलिक कुटुंब डोंगरी परिसरात वास्तव्याला होतं. वयाच्या एकविसाव्या वर्षी 1980 साली नवाब यांचा विवाह मेहजबीन यांच्याशी झाला. त्यांना फराज, आमीर ही दोन मुलं तर निलोफर आणि सना या दोन मुली आहेत.

सुरुवातीला नवाब यांचं प्राथमिक शाळेतलं अॅडमिशन सेंट जोसेफ या इंग्रजी शाळेत करण्यात आलं होतं. पण त्याला वडील मोहम्मद इस्लाम यांचे नातेवाईक आणि मित्रमंडळींचा विरोध झाल्यामुळे त्यांनी ते रद्द केलं. असं नवाब मलिक यांनी नुकतेच एका मुलाखतीत हा किस्सा सांगितला होता.

पुढे महापालिकेच्या नूरबाग उर्दू शाळेत नवाब यांना दाखल करण्यात आलं. इथूनच त्यांनी चौथ्या इयत्तेपर्यंत शिक्षण घेतलं. त्यानंतर डोंगरीच्या जीआर नंबर 2 शाळेत सातवीपर्यंत आणि CST परिसरातील अंजुमन इस्लाम शाळेत अकरावीपर्यंतचं (तत्कालीन मॅट्रीक) शिक्षण त्यांनी घेतलं. मॅट्रीक पूर्ण झाल्यानंतर त्यांनी बुऱ्हाणी कॉलेजमधून बारावी पूर्ण केलं. तसंच त्याच कॉलेजमध्ये बीएसाठी अॅडमिशन घेतलं. पण कौटुंबिक कारणामुळे त्यांनी बीएची अंतिम वर्षाची परीक्षा दिली नाही.

दरम्यान, नवाब मलिक महाविद्यालयात शिक्षण घेत असताना मुंबई विद्यापीठाने महाविद्यालयीन फी वाढवली होती. त्याचा विरोध करण्यासाठी शहरात एक आंदोलन झालं. त्या आंदोलनामध्ये नवाब मलिक यांनी एका सर्वसामान्य विद्यार्थ्याप्रमाणेच सहभाग नोंदवला होता. या आंदोलनादरम्यान पोलिसांकडून लाठीमार झाला होता. त्यात नवाब जखमी झाले. दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांनी पोलीस आयुक्तालयावरही मोर्चा काढला होता. तिथंही ते गेले. याच कालावधीत आपल्याला राजकारणात रस निर्माण झाल्याचं नवाब मलिक सांगतात.

1977 साली केंद्रात जनता पक्षाचं सरकार आलं. पुढे तरुणांमध्ये या सरकारच्या विरोधात वातावरण निर्माण झालं होतं. त्यामुळे अधून-मधून काँग्रेसकडून आयोजित लहान-मोठ्या बैठकांमध्ये मी सहभागी होऊ लागलो. पण त्यावेळी विशेष काही सक्रिय नव्हतो. व्यवसाय सांभाळून राजकीय-सामाजिक काम सुरू होतं. असं नवाब मलिक सांगतात.

बाबरी प्रकरणानंतर मुस्लीम मतदारांमध्ये समाजवादी पक्ष लोकप्रिय होऊ लागला होता. याच लाटेत नवाब मलिक यांनीही समाजवादी पक्षात प्रवेश केला. 1995 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना मुस्लीम बहुल मानल्या जाणाऱ्या नेहरूनगर मतदारसंघाचं तिकीट पक्षाकडून मिळालं. त्यावेळी शिवसेनेचे सूर्यकांत महाडिक यांनी 51 हजार 569 मते मिळवून विजय प्राप्त केला. तर दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या मलिक यांना 37 हजार 511 मते मिळाली. मलिक पराभूत झाले, पण पुढच्याच वर्षी या मतदारसंघात पुन्हा निवडणूक लागली. आमदार महाडिक यांनी धर्माच्या आधारावर मतं मागितल्याच्या प्रकरणात त्यांच्याविरोधात दाखल याचिकेवर सुनावणी सुरू होती. यात ते दोषी आढळल्याने निवडणूक आयोगाने ही निवडणूक रद्द ठरवली. त्यामुळे नेहरू नगर मतदारसंघात 1996 साली पुन्हा निवडणूक लागली. यावेळी मात्र नवाब मलिक यांनी सुमारे साडेसहा हजारांच्या फरकाने विजय मिळवला.

1999 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत नवाब मलिक यांनी समाजवादी पक्षाकडून पुन्हा विजय मिळवला. यावेळी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांचं आघाडी सरकार सत्तेत आलं. समाजवादी पक्षाकडून दोन आमदार निवडून आले होते. आघाडीला पाठिंबा दिल्यामुळे त्यांनाही सत्तेत वाटा देण्यात आला. सत्ता समीकरणात नवाब मलिक यांची गृहनिर्माण राज्यमंत्रीपदी वर्णी लागली. त्यांचा कारभार योग्यरित्या सुरू होता. पण याच काळात मलिक यांचे समाजवादी पक्षातील नेत्यांशी असलेले मतभेद चव्हाट्यावर आले. त्याला कंटाळून अखेर मलिक यांनी मंत्रिपदावर असतानाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. आणि पुढे मलिकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुस्लिम चेहरा म्हणून राज्यभर डंका वाजवला.