कोल्हापुरात पराभव दिसताच भाजपाकडून मतदारांना पैसे वाटण्याचा प्रयत्न  : अतुल लोंढे

भाजपा कार्यकर्ते रोख रक्कम व मुद्देमालासह पोलिसांच्या ताब्यात 

मुंबई – कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत (Kolhapur North Assembly by-election) भाजपाचा (BJP) पराभव होत असल्याचे स्पष्ट आहे. पराभव दिसू लागताच भाजपाकडून साम, दाम, दंड, भेदचा वापर केल्याचे स्पष्ट झाले असून मतदारांना पैसे वाटप करत असल्याचा प्रकार काँग्रेस कार्यकर्त्यांमुळे उघड झाला आहे. निवडणूक आयोगानेही याची योग्य ती दखल घ्यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe)  यांनी केली आहे.

यासंदर्भात बोलताना अतुल लोंढे म्हणाले की, मंगळवार पेठेतील पद्मावती परिसरातील भारतीय जनता पक्षाच्या माजी नगरसेविका सुनंदा मोहिते (Sunanda Mohite)  यांच्या कार्यालयातून रोख पैशाची पाकीटे, मतदारांची यादी व भाजपाची प्रचार पत्रके मिळाली आहेत. दसरा चौकातही पैसे वाटपाचा प्रयत्न उघड झाला आहे. पोलिसांनी यासंदर्भात काही लोकांना ताब्यात घेतलेले आहे.

भारतीय जनता पक्ष कोणत्याही थराला जाऊ शकतो हे पुन्हा एकदा स्पष्ट झालेले आहे. हे पैसे कोणाचे, कोणी पाठवले याचा तपास होणे गरजेचे आहे. पोलीस त्यांच्या तपास करुन यामागे कोण आहे त्याचा शोध घेतलीच पण कोल्हापूर पोटनिवडणुकीत भाजपाचा पराभव करून महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव (Jayashri jadhav)  यांना विजयी करायचे कोल्हापूरच्या जनतेने निश्चित केले आहे. भाजपाच्या कोणत्याही आमिषाला ते बळी पडणार नाहीत, असेही लोंढे म्हणाले.