अभद्र भाषेत टीका करणाऱ्या संजय राऊत यांची खासदारकी रद्द करा; मंगलप्रभात लोढा यांची मागणी

मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याबद्दल सामना वृत्तपत्रातून अत्यंत असभ्य भाषेत लिखाण करण्यात आल्यामुळे, त्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीकडून सर्वत्र आंदोलन करण्यात आले होते. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री व मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांच्या नेतृत्वाखाली देखील स्वामी विवेकानंद स्मारक नित्यानंद हॉटेल समोर प्रार्थना समाज, गिरगाव येथे आंदोलन करण्यात आले होते. प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि युवा मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

या वेळी उपस्थितांनी आपला निषेध व्यक्त करताना संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्या विरुद्ध नारे बाजी केली आणि दोघांनी माफी मागावी अशी मागणी केली. संतप्त आंदोलकांनी सामना वृत्तपत्राच्या आवृत्तीचे दहन देखील केले. संजय राऊत, जोपर्यंत माफी मागत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरु राहील असे मंत्री लोढा यांनी यावेळी सांगितले.

“आमचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल संजय राऊत यांनी जे काही लिहीले आहे, ते अतिशय अयोग्य आहे. मी सरकारकडे मागणी करतो कि संजय राऊत यांची खासदारकी रद्द करावी. त्यांच्या लिखाणावर फक्त भाजपाचा नाही, तर महाराष्ट्रातील १२ कोटी जनतेचा आक्षेप आहे आणि त्यांच्या विरुद्ध आम्ही पोलिसात तक्रार करणार आहोत. पूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट आहे, फक्त प्रसिद्धीसाठी सुरु असलेल्या संजय राऊत यांच्या बेताल वक्तव्याची उद्धव ठाकरे यांनी दखल घ्यावी. जोपर्यंत संजय राऊत माफी मागत नाही, तोपर्यंत हे आंदोलन असेच सुरु राहील!” असे उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले.