माजी भारतीय क्रिकेटरच्या कारचा अपघात, भरधाव कँटरने दिली धडक; मुलगाही होता गाडीत

मेरठ : माजी क्रिकेटपटू प्रवीण कुमार (Praveen Kumar) याच्या कारला मंगळवारी रात्री उशिरा आयुक्तांच्या निवासस्थानाजवळ एका भरधाव कॅंटरने धडक दिली. या दुर्घटनेत प्रवीण कुमार थोडक्यात (Praveen Kumar Accident) बचावला. पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपी कॅंटर चालकाला अटक केली.

बागपत रोडवरील मुलतान नगर येथील रहिवासी प्रवीण कुमार मंगळवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास त्याच्या डिफेंडर वाहनाने पांडव नगर येथून येत होता. त्याच्यासोबत त्याचा मुलगाही होता. ते आयुक्तांच्या निवासस्थानाजवळ पोहोचताच समोरून भरधाव वेगात आलेल्या कॅंटरने त्याच्या कारला धडक दिली.

या धडकेत वाहनाचे नुकसान झाले, तर प्रवीण कुमार आणि त्याचा मुलगा थोडक्यात बचावले. अपघातानंतर तेथे लोकांचा जमाव जमला, त्यांनी कॅंटर चालकाला जागीच पकडले. माहिती मिळताच सिव्हिल लाईन पोलीस घटनास्थळी दाखल झाले. एसपी सिटी पीयूष कुमार यांनी सांगितले की, कॅंटर चालकाला ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात पाठवण्यात आले आहे. सीओने सांगितले की, अपघातात प्रवीण कुमार आणि त्याचा मुलगा सुरक्षित आहेत.