‘5-10 वर्षांपूर्वी ईडी नावाची संस्था कुणाला माहिती नव्हती, आता ही ईडी गावागावात गेली’

ठाणे – ईडीनं मोठी कारवाई करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे अर्थात रश्मी ठाकरे यांचे बंधु श्रीधर पाटणकर यांच्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई केली आहे. यामध्ये ठाण्यातल्या वर्तक नगर भागातील ‘निलांबरी’ अपार्टमेंटमधील एकूण ६ सदनिका जप्त करण्यात आल्या आहेत. ईडीनं थेट ही कारवाई केल्याने महाविकास आघाडीतील नेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

 

पुष्पक बुलियन या कंपनीशी संबंधित एका प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. या सदनिका आणि एकूण जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांची किंमत अंदाजे ६ कोटी ४५ लाख रुपये असल्याची माहिती मिळत आहे. 6 मार्च 2017 मध्ये नोंदवलेल्या मनी लाँडरिंग प्रकरणी ही कारवाई असल्याचंही स्पष्ट करण्यात आलंय.

महेश आणि चंद्रकांत पटेल यांच्या मालकीच्या पुष्पक ग्रुपमधील पुष्पक बुलियन्सच्या मनी लाँडरिंगबाबत ही कारवाई आहे. या प्रकरणी तब्बल 21.46 कोटी रुपयांची मालमत्ता यापूर्वीच जप्त करण्यात आली आहे. या कारवाईमुळे महाविकास आघाडी विरुद्ध केंद्रीय तपास यंत्रणा असा संघर्ष पुन्हा ताणला जाणार, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आरोप-प्रत्यारोप आणि राजकीय सूडबुद्धीतून ही कारवाई केली गेली आहे का, यावरुन चर्चांना उधाण आलं आहे.

 

दरम्यान, या सर्व घडामोडींवर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची प्रतिक्रिया आली आहे. ईडी सारख्या साधनांचा गैरवापर वाढला आहे. हा सध्या देशासमोर महत्त्वाचा प्रश्न आहे. ईडीच्या कारवाईची आकडेवारी समोर आली. ती स्पष्ट सांगते की, हा कार्यक्रम कोणालातरी राजकीय हेतूने त्रास देण्यासाठी हाती घेतला आहे. स्पष्ट सांगायचं म्हणजे 5-10 वर्षांपूर्वी ईडी नावाची संस्था कुणाला माहिती नव्हती. आता ही ईडी गावागावात गेली. दुर्दैवाने या सगळ्या गोष्टींचा गैरवापर सध्या चालू आहे. बघुयात आता याला काही पर्याय आहेत. पण त्यावर आता चर्चा न केलेली बरी. असं पवार म्हणाले आहेत.