पाकड्यांचे जगणे होणार मुश्कील; महागाईचा आणखी एक बॉम्ब फुटणार, आता पेट्रोलचे दर गगनाला भिडणार

Pakistan Petrol Prices: ऐतिहासिक आर्थिक संकट आणि महागाईशी झुंजणाऱ्या पाकिस्तानी जनतेच्या समस्या सुटण्याचे नाव घेत नाहीत. एकीकडे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडत आहेत तर दुसरीकडे डिझेल आणि पेट्रोलच्या किमती महागाई आणखी वाढवत आहेत. अशा परिस्थितीत आता पाकिस्तान सरकार पुन्हा पेट्रोलच्या दरात वाढ करण्याच्या विचारात असल्याच्या बातम्या येत आहेत.

पाकिस्तानी मीडियाच्या हवाल्याने पीटीआय या वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे. बातम्यांनुसार, रोखीच्या तुटवड्याचा सामना करत असलेले पाकिस्तान सरकार पेट्रोलच्या दरात प्रति लीटर 10-14 रुपयांनी वाढ करणार आहे. आधीच गगनाला भिडणाऱ्या महागाईने होरपळणाऱ्या जनतेच्या अडचणी वाढवण्याचे हे पाऊल ठरणार आहे. मात्र, खराब आर्थिक स्थितीमुळे पाकिस्तान सरकारपुढे इतर पर्याय संपले आहेत.

पाकिस्तानमधील तेल डेपोमध्ये पेट्रोलची सध्याची किंमत 272 रुपये प्रति लीटर आहे. जर सरकारने जागतिक तेलाच्या दरवाढीचा बोजा ग्राहकांवर टाकला तर ही किंमत 286.77 रुपये प्रति लिटरपर्यंत जाऊ शकते. पाकिस्तानमध्येही सरकार पेट्रोलवर प्रति लिटर 50 रुपये उपकर लावते. मात्र, हाय-स्पीड डिझेलच्या दरात कोणताही बदल होण्याची शक्यता कमी आहे. सरकारने विनिमय दरातील तूट समायोजित केली नाही तर डिझेलच्या दरात प्रतिलिटर 15 रुपयांपर्यंत घसरण होऊ शकते.