विकृतपणाचा कळस : वडिलांचे हातपाय बांधून नराधम मुलाने आईसोबत केले भयानक कृत्य

 Hingoli Crime : हिंगोली जिल्ह्यात एका नराधम आणि विकृत दारुड्या मुलाने आपल्याच आईवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या नराधम मुलाने आधी वडिलांचे हातपाय बांधले आणि त्यानंतर वडिलांसमोरच आईवर बलात्कार केला. याप्रकरणी या नराधमावर हिंगोलीच्या करमनुरी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून, त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील धानोरा गावात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यातील आरोपी मुलाला दारु पिण्याची सवय होती. तर दारू पिऊन तो आपल्या आई-वडिलांना नेहमी त्रास द्यायचा. मात्र त्याने रविवारी मध्यरात्री जे कृत्य केलं ते ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे. या नराधम मुलाने आपल्याच आईवर अत्याचार केल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

रविवारी रात्रीच्या सुमारास आरोपी नेहमीप्रमाणे दारू पिऊन घरी आला. यावेळी त्याचे आई-वडील झोपलेले होते. घरात आल्यावर त्याने आई-वडीलांना उठवत त्यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. पण त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्यामुळे त्याने भांडण सुरु केले. एवढंच नाहीत तर दारुसाठी पैसे देत नसल्याने आरोपीला खूपच राग आला. त्यामुळे त्याने आपल्या वडिलांचे हातपाय बांधले. तसेच त्यांच्यासमोरच स्वतःच्या आईवर अत्याचार केले. एबीपी माझाने याबाबत वृत्त दिले आहे.