राज्यघटना दुरूस्ती करून एससी, एसटीप्रमाणे ओबीसींची जनगणना करावी : बावनकुळे

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi ) यांनी राज्यघटना दुरूस्ती ( Constitution Amendment ) करावी आणि एससी(SC), एसटींची(ST) जशी जनगणना होते, त्या पद्धतीने ओबीसींची (OBC) जनगणना ( OBC Census ) करावी, अशी मागणी राज्याचे माजी मंत्री आणि भाजपा प्रदेश सरचिटणीस आ. चंद्रशेखर बावनकुळे ( Chandrasekhar Bavankule ) यांनी केली आहे. 1950 पासून कोणत्याही सरकारने ओबीसींची जनगणना केलेली नाही. त्यामुळे ती होणे गरजेची असल्याचे बावनकुळे म्हणाले.

ओबीसी समाजाने आता एकजुटीने राजकीय आरक्षणाची मागणी केली पाहिजे. राजकीय भूमिका बाजूला ठेऊन आपण सर्वांनी एकत्रितरीत्या केंद्र सरकारकडे ही मागणी करावी असे बावनकुळे यांनी म्हटले आहे. ते नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यातील गादा या गावात आयोजित करण्यात आलेल्या ओबीसी मेळाव्यात बोलत होते. याच कार्यक्रमासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पण उपस्थित होते. सर्वच समाजातील लोकांनी केंद्राच्या खासगीकरणापासून सावध राहण्याची गरज असल्याचे मत नाना पटोले यांनी यावेळी व्यक्त केले आहे.

वेगवेगळ्या सार्वजनिक उद्योग आणि शासकीय सेवांचे आता खासगीकरण केले जात असून अशाने भविष्यात सर्व नोकऱ्या खासगी क्षेत्रात जातील. खासगी क्षेत्रात आरक्षणाची अंमलबजावणी होणार नाही अशी भीती नाना पटोले ( Nana Patole ) यांनी यावेळी बोलून दाखविली. राष्ट्रीय ओबीसी महासंघाने ( National Federation of OBCs ) आयोजित केलेल्या या ओबीसी मेळाव्यात काँग्रेस आणि भाजपच्या विदर्भातील ओबीसी नेत्यांनी हजेरी लगावली होती.