सगळीकडे ढवळाढवळ करण्याचा अधिकार या विश्व प्रवक्त्यांना कुणी दिला ? 

कोल्हापूर –  राज्यसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी पत्रकार परिषद घेत मोठा आरोप केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी शब्द मोडला, असा दावा छत्रपती संभाजी राजे यांनी केला. पुढील स्थिती पाहता आपण निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. पण ही माघार नाही, असं संभाजीराजे छत्रपती यांनी स्पष्ट केलं आहे.

संभाजीराजेंच्या या आरोपामुळे शिवसेना संभाजीराजे समर्थक आणि भाजपच्या निशाण्यावर आली आहे.   राजेंनी माघार घेतल्यानंतर शिवसेनेवर टीका होऊ लागल्यानंतर आता शिवसेनेकडून खासदार संजय राऊत यांनी कोल्हापूरमधून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. छत्रपती आणि आमचा विषय आहे, इतरांनी त्यामध्ये चोंबडेपणा करू नये असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज कोल्हापूरमधून कोल्हापूरच्याच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लगावला होता.  या टीकेला आता चंद्रकांत पाटील यांनी पलटवार करत प्रत्युत्तर दिले आहे.

चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करून प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, मी शिवाजी महाराजांचा वंशज नाही, हे सामान्य ज्ञान आहे. पण हिंदुत्वविरोध्यांसोबत चाललेल्यांना शिवरायांची मक्तेदारी कुणी दिली? तुम्ही शब्दांचे पक्के आणि बाकीचे सगळेच खोटारडे, यावर शेंबडं पोर तरी विश्वास ठेवेल ? आणि हो… सगळीकडे ढवळाढवळ करण्याचा अधिकार विश्वप्रवक्त्यांना कुणी दिला ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.