धमक्या आल्या तर मला काहीच करावं लागणार नाही, संभाजीराजे आक्रमक

मुंबई : खासदार संभाजीराजे मराठा समाजाच्या मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानाद आमरण उपोषणाला बसले आहेत. छत्रपतींना धमक्या? मला धमक्या आल्या तर मला काहीच करावं लागणार नाही. माझा फक्त छत्रपती घराण्यात जन्म झाला आहे. कोट्यवधी पाईक आहेत की, असा सूचक इशारा खासदार संभाजी छत्रपती यांनी आज धमक्या देणाऱ्यांना दिला आहे.

यावेळी त्यांनी सातही मागण्यांबाबत सरकारकडून कशी निराशा झाली याची माहितीही त्यांनी दिली. तसेच सरकारने शब्द पाळला नाही. त्यामुळेच आपल्याला उपोषण करण्याची वेळ आल्याचंही त्यांनी सांगितलं. तसेच उपोषणाचा इशारा दिल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांचे आपल्याला फोन आले होते. पण प्रवासात असल्याने त्यांच्याशी बोलणं झालं नाही, असं संभाजी छत्रपती यांनी स्पष्ट केलं.

खासदार संभाजी छत्रपती यांनी आज पुन्हा सात मागण्यांवरून सरकारला धारेवर धरले. अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाला निधी देण्याचं आश्वासन दिलं. पण हा निधी मिळाला नाही. सारथीमध्ये मुव्हमेंट सुरू झाली. पुणे आणि कोल्हापुरात सारथीचं केंद्र सुरू झालं. पण आठ महिने झाले. तिथे कोर्सेस सुरू नाही. अतिरिक्त स्टाफ नेमला नाही. जागा हस्तांतर झाली नाही. एक एकरची जागा पाच एकर करायची होती ती झाली नाही. मग मी लढाई करायला नको का? सारथीला 500 कोटी रुपये द्यावे ही आमची मागणी होती. त्यावेळी अजित पवार म्हणाले 500 कोटीची मागणी केली अन् 51कोटी खर्च झाले तर पुढच्यावर्षी 51 कोटीच मिळतील. त्यांनी सांगितलं प्लानिंग करू. जेवढा खर्च होईल तेवढा देऊ, असं सांगितलं. आम्ही त्याला मान्यता दिली. पण त्याची ब्ल्यू प्रिंट अजूनही तयार झाली नाही, असं संभाजी छत्रपती म्हणाले.