अमृता फडणवीस यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या अशोक गावडेंवर अखेर गुन्हा दाखल

नवी मुंबई – नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांची जीभ घसरली असून अमृता फडणवीस यांचाआक्षेपार्ह शब्दाचा उल्लेख त्यांनी भाषणात केला आहे. वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात नवाब मालिकांच्या ईडीने केलेल्या कारवाईविरोधात आंदोलन चालू असताना आपल्या भाषणात त्यांनी ही मुक्ताफळे उधळली आहेत.

“आमच्या कोणत्याही मुख्यमंत्र्यांची पत्नी अशा पध्दतीने कोठेही टीका करत नाही. परंतु ही डान्सबारमधली मात्र रस्त्यावर येऊन बोलते”, असे आक्षेपार्ह वक्तव्य गावडे यांनी केले. मुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्र्यांच्या धर्मपत्नीने कशा प्रकारचे वक्तव्य केले पाहिजे असेही ते म्हणाले.या आंदोलनावेळी महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांसोबत महिला पदाधिकारी तसेच कार्यकर्त्या देखील मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

दरम्यान, अशोक गावडे यांनी पातळी सोडून खालच्या भाषेत टीका केल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता युवा मोर्चा आक्रमक झाला होता.या विषयात भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चा कार्यकर्ते आक्रमक असल्याने आता कलम ५०९ अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. संपूर्ण स्त्री वर्गाचा अपमान केल्याच्या निषेधार्थ भाजपा कार्यकर्ते पोलीस स्थानकात ठाण मांडून बसले होते.या प्रसंगी आमदार मंदा म्हात्रे,भाजपा युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील भाजपा जिल्हा अध्यक्ष रामचंद्र घरत,नवी मुंबई युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष दत्ता घंगाळे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.