‘आदीपुरुष’च्या बजरंगबलीकडून बजरंग दलाची भाषा बोलवण्यात आली; मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचा निशाणा

आदिपुरुष (Adipurush) हा चित्रपट १६ जून रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आणि तेव्हापासून सातत्याने टीका होत आहे. काहींना रावणाचे रूप आवडले नाही तर काहींना हनुमानजींची भाषा टपोरीसारखी वाटली. त्याचवेळी काही लोक रामायणातील दृश्ये चुकीच्या पद्धतीने दाखवल्याचा आरोप करत आहेत. आता छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) यांनी राज्यात या चित्रपटावर बंदी घालण्याचे संकेत दिले आहेत. यासोबतच आदिपुरुषाच्या बजरंगबलीकडून बजरंग दलाची भाषा वापरण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.

राज्य सरकार चित्रपटावर बंदी घालणार का, असे पत्रकारांनी विचारले असता बघेल म्हणाले, “जर लोकांनी या दिशेने मागणी केली तर सरकार त्यावर विचार करेल. आम्ही पाहिले आहे. भगवान राम आणि भगवान हनुमानाचे कोमल चेहरे भक्तीमध्ये भिनले होते, परंतु गेल्या काही वर्षांपासून ही प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे. ज्ञान, शक्ती आणि भक्तीचे प्रतीक म्हणून हनुमानाची बालपणापासून ओळख करून दिली जाते, परंतु या चित्रपटात भगवान राम ‘युद्धक’ (योद्धा) म्हणून दाखवले आहेत. राम आणि हनुमान एँग्री बर्ड्स म्हणून चित्रित केले आहेत. हनुमानाच्या अशा प्रतिमेची आपल्या पूर्वजांनी कल्पनाही केली नव्हती किंवा आपला समाजही ती स्वीकारत नाही.”

बघेल पुढे म्हणाले, “या चित्रपटातील संवाद आणि भाषा अशोभनीय आहे. तुलसीदासांच्या रामायणात, भगवान रामांना ‘मर्यादा पुरुषोत्तम’ म्हणून चित्रित केले गेले आणि दरबारी भाषा वापरली गेली. ‘आदिपुरुष’मधील पात्रांचे संवाद अत्यंत खालच्या पातळीवरचे आहेत. राजीव गांधी पंतप्रधान असताना त्यांनी रामानंद सागर यांना रामायण ही महाकाव्य मालिका बनवण्याची सूचना केली, जी प्रचंड लोकप्रिय झाली. आदिपुरुषाच्या बहाण्याने राम आणि हनुमानाच्या चित्रांची विपर्यास करून पात्रांच्या तोंडी अश्लील शब्द टाकण्यात आले. यातून तरुण पिढी काय शिकणार?”

या चित्रपटात भगवान बजरंग बली यांना बजरंग दलाच्या भाषेत संबोधण्यात आल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला आहे. ते म्हणाले, “हनुमानजींना धर्माचे रक्षक म्हणणाऱ्या राजकीय पक्षांचे लोक या चित्रपटावर गप्प का आहेत? ‘द काश्मीर फाइल्स’ आणि ‘द केरळ स्टोरी’वर विधाने करणारे भाजपचे नेते ‘आदिपुरुष’वर गप्प का आहेत? काहीच बोलत नाहीत.”