‘वाईन हे हेल्थ फूड आहे हे पवार साहेबांनी सांगितले,  त्याच्या प्रचार आणि प्रसारासाठी प्रयत्न केले’

नाशिक :- नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात कृषी प्रक्रिया उद्योग वाढत आहे. यामुळे शेतकऱ्यांना अधिक फायदा होत असून नाशिकच्या अर्थकारणाला गती मिळत आहे. त्यामुळे हे उद्योग अधिक विकसित व्हावे. तसेच नाशिकच्या कृषी पर्यटनात नाशिकच्या वाईन उद्योगाचा वाटा अधिक आहे असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

सुला विनियार्डस लिमिटेड (Sula Vineyards Limited) संस्थेच्या नवीन वाईन सेलारचे (Wine cellar) उद्घाटन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार दिलीप बनकर, आमदार नितीन पवार, आमदार माणिकराव कोकाटे, आमदार देवयानी फरांदे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी आशिमा मित्तल, जगदीश होळकर, गणपत पाटील, सुलावाईन संचालक राजीव सामंत, संजीव पैठणकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, नाशिक द्राक्षांसाठी पूर्वी पासून प्रसिद्ध आहे. या पिकाला हवामान आणि मार्केट मुळे फटका बसत आहे. मात्र नाशिकच्या द्राक्ष शेतकऱ्यांच्या दृष्टीने वाईन उत्पादन अतिशय महत्वाचे ठरले आहे. देशात नाशिक हे वाईन कॅपिटल म्हणून ओळखले जाते. देशातील वाईन उत्पादनापैकी निम्याहून अधिक वाईन ही नाशिकमध्ये तयार होते असे त्यांनी यावेळी सांगितले.

ते म्हणाले की, वाईन हे हेल्थ फूड आहे हे पवार साहेबांनी सांगितले. त्याच्या प्रचार आणि प्रसारासाठी प्रयत्न केले. त्यावर वादही झाले. मात्र त्याच वाईन क्षेत्राने आज यशस्वी वाटचाल केली आहे. पवार साहेबांचा दूरदृष्टीपणा यातून आपल्याला दिसतो. देशात वाईन कल्चर वाढतंय ही चांगली बाब असून यातून अर्थकारणाला अधिक गती मिळते असे त्यांनी सांगितले. तसेच विंचूर औद्योगिक वसाहतीत वाईनसह फळप्रक्रिया उद्योगाला चालना देण्यात येत आहे असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी आमदार दिलीप बनकर, आमदार देवयानी फरांदे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, संचालक राजीव सामंत, यांनी मनोगत व्यक्त केले.