‘उद्धवजी … नैसर्गिक युती व्हावी ही अखंड महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील सर्व शिवसैनिकांची इच्छा आहे’

मुंबई – राज्यात शिवसेना आमदारांचा एक मोठा गट फुटून वेगळा झाल्यामुळे गेल्या पाच दिवसांपासून मोठा सत्ता संघर्ष पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे कट्टर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत तब्बल ४२ आमदारांनी बंड पुकारलं आहे. दोन्ही बाजूंनी दावे अन् प्रतिदावे केले जात आहेत. त्यामुळे हा वाद आता विकोपाला गेला आहे. दुसरीकडे पक्षाला भगदाड पडल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) देखील पक्ष संघटना टिकवून ठेवण्यासाठी पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊ लागले आहेत.

दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील पारोळा मतदारसंघाचे आमदार चिमणराव आबासाहेब पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. नैसर्गिक युती व्हावी ही अखंड महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील सर्व शिवसैनिकांची इच्छा आहे. म्हणूनच या विचारधारेसाठी केलेल्या या बंडाच्या भूमिकेला पक्षातील दोन तृतीयांश पेक्षा अधिक आमदार आणि १० सहयोगी अपक्ष आमदारांचे समर्थन आहे.असं ते म्हणाले.

आम्ही गेली ३० वर्ष प्रथम काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस सोबत संघर्ष करत आहोत. काँग्रेस – राष्ट्रवादी सोबत आमचा परंपरागत संघर्ष होता आणि यापुढेही राहील. आमच्या मतदारसंघात आमचे प्रमुख विरोधक राष्ट्रवादी काँग्रेस, आमच्या पुढील विधानसभा निवडणुकीत त्यांच्या विरुद्धच लढाई आहे. या भूमिकेतूनच आम्ही सर्व आमदारांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांस विनंती केली की, नैसर्गिक युती व्हावी. पण त्यांच्याकडून दाद न मिळाल्याने आम्ही आमचे नेते एकनाथजी शिंदे यांस ही स्पष्ट भूमिका घेण्याचा आग्रह धरला.असं देखील ते म्हणाले.