गिटहब अॅपवर वादग्रस्त मजकुरासह प्रसिद्ध मुस्लिम महिलांचे फोटो, चतुर्वेदींकडून तक्रार दाखल

मुंबई – एका अॅपवर शेकडो मुस्लिम महिलांचे फोटो अपलोड केल्याची घटना समोर आली आहे. शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी शनिवारी सांगितले की, होस्टिंग प्लॅटफॉर्म गिटहब वापरून शेकडो मुस्लिम महिलांचे फोटो अॅपवर अपलोड केले आहेत. ही बाब मुंबई पोलिसांकडे मांडण्यात आली आहे.

याप्रकरणी खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार केली असून, दोषींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली आहे. त्यांनी ट्विट केले की, “मी मुंबईचे पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्त (गुन्हे) रश्मी करंदीकर जी यांच्याशी बोलले आहे. मी मध्यस्थी करण्यासाठी महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांशीही (डीजीपी) बोलले आहे. या प्रकारामागे जे लोक आहेत त्यांना पकडले जाईल अशी आशा आहे.

प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या की, त्यांनी माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे सुलीडील्स सारख्या प्लॅटफॉर्मद्वारे महिलांना लक्ष्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची विनंती वारंवार केली आहे. त्याकडे दुर्लक्ष होत आहे ही शरमेची बाब आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली असून संबंधित अधिकाऱ्यांना कारवाई करण्यास सांगितले आहे.