आतापासूनचा नव्हे तर वचन दिलेत त्या तारखेपासूनचा घरांचा मालमत्ता कर पुर्ण माफ करा –  शेलार 

 मुंबई – आतापासूनच नव्हे तर वचन दिलेत त्या तारखेपासून  500चौ.फु. घरांचा मालमत्ता कर पुर्ण माफ करा अशी मागणी करीत भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी, आता सत्तेची खुर्ची डळमळीत झाली म्हणून शिवसेनेला मुंबई करांची आठवण झाली असा टोलाही लगावला आहे.

मुंबईतील 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्यात येत असल्याची घोषणा सरकारने केली आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना आमदार अँड आशिष शेलार म्हणाले की, या निर्णयाला एवढा उशीर का झाला? गेली चार वर्षे का निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे आतापासून नको तर मागिल चार वर्षांचा कर ही मुंबईकरांना परत करा. जेव्हा वचन दिलेत तेव्हा पासूनची करमाफी करा अशी मागणी आमदार आशिष शेलार यांनी केली आहे.

ते पुढे म्हणाले की,  मुंबईतील अती श्रीमंत सोडून ज्या मध्यमवर्गीयांची घरं 500 चौ. फु. पेक्षा मोठी आहेत, त्यांचाही 500चौ. फु. पर्यंतचा कर माफ करा. म्हणजे ज्या मध्यमवर्गीय मुंबईकरांची घरे 600,650, 700 चौरस फुटाची आहेत त्यांचाही 500 चौरस फुटापर्यंत कर माफ करा व त्यापेक्षा जास्त असलेल्या क्षेत्रफळाचाच कर त्यांना आकारण्यात यावा. यासोबतच 500 चौ. फु.पर्यंतच्या दुकानदारांही हीच सुट देणार का? ज्यांंचा मुंबईत फुलांचा, भाजीचा, केशकर्तनालय, फळे सारख्या व्यवसाय करणारा छोटा व्यापारी आहे, त्याच्या गाळ्याचा 500 चौ. फुटापर्यंतचा कर माफ करा, अशी मागणी आमदार अँड आशिष शेलार यांनी केली आहे.

सरकारने विलंबाने घेतलेल्या या निर्णयाचा समाचार घेताना शेलार पुढे म्हणाले की, सरकारच्या तिजोरीत खडखडाट होता तरीही प्रथम बिल्डरांना प्रिमियममध्ये 11 हजार कोटींची सुट दिलीत. बार,पब,रेस्टॉरंटना लायसन्स फी मध्ये सवलत दिलीत. विदेशी दारुला करात 50% सुट दिलीत, वायनरींवर पण सवलतींची खैरात झाली.. मग मुंबईकरांच्या निर्णयाला का विलंब झाला? आता पालिकेच्या सत्तेची खुर्ची डळमळली तेव्हा मुंबईकरांची आठवण झाली का? असा सवालही त्यांनी केला आहे.