भारत सरकारने RBI च्या डेप्युटी गव्हर्नर पदासाठी अर्ज मागवले; पगार किती? पात्रता काय? जाणून घ्या सर्व काही 

RBI – भारत सरकारने RBI च्या डेप्युटी गव्हर्नर पदासाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. सध्या एमके जैन या पदावर आहेत, त्यांचा कार्यकाळ जूनमध्ये पूर्ण होत आहे. जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, सरकारने यासाठी 19 मार्च रोजी वृत्तपत्रांमध्ये जाहिराती दिल्या असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 एप्रिलपर्यंत निश्चित करण्यात आली आहे.

पात्रता काय असावी? 
बँकिंग आणि वित्तीय बाजारपेठेतील किमान 15 वर्षांचा अनुभव असावा, असे भारत सरकारने अधिसूचनेत म्हटले आहे. त्यात खासगी क्षेत्रातीलही एक असण्याची शक्यता आहे. मात्र, आतापर्यंत एकाही डेप्युटी गव्हर्नरची खासगी क्षेत्रातून निवड झालेली नाही. अर्जदाराचे वय 22 जून 2023 रोजी 60 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

अर्जदारांच्या निकषांमध्ये पूर्णवेळ संचालक किंवा बोर्ड सदस्य म्हणून विस्तृत अनुभव समाविष्ट असावा. आर्थिक क्षेत्रातील पर्यवेक्षण आणि अनुपालनाची अत्यंत वरिष्ठ पातळीवरील समज, आर्थिक कामगिरी डेटासह कार्य करण्याची मजबूत क्षमता, कोणत्याही विषयावर चर्चा करण्याची आणि तपशीलवार माहिती सादर करण्याची क्षमता असणे आवश्यक आहे.

पगार किती असेल? 
या पात्रतेसाठी सरकारने सर्वसमावेशक अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार डेप्युटी गव्हर्नर पदासाठीचे संपूर्ण निकष स्पष्ट करण्यात आले आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 एप्रिल आहे. सध्याचे डेप्युटी गव्हर्नरचे पद रिक्त होत असल्याने जूनमध्ये नवीन डेप्युटी गव्हर्नरची निवड होऊ शकते. अधिसूचनेनुसार, नवीन डेप्युटी गव्हर्नरचा पगार 2.25 लाख रुपये (लेव्हल-17) प्रति महिना असेल.