खूप शिका, मोठे व्हा, पण आर के लक्ष्मण यांनी जिवंत केलेला कॉमन मॅन विसरू नका : नीलम गोऱ्हे

पुणे : विनोद हा बघणाऱ्याच्या डोळ्यांत असतो. आर.के.लक्ष्मण यांनी नेहमीच सामान्य माणसाच्या डोळ्यांतल्या भावना ओळखून व्यंगचित्र काढली व त्या चित्रांना जनतेने उचलून धरलं. शब्दांपेक्षा एक व्यंगचित्र मौल्यवान असतं आणि आर के लक्ष्मण यांनी नेहमीच याप्रकारची बोलकी चित्रे काढत समाजातील व्यंग दाखवून दिले. त्यामुळे मुलांनो खूप शिका, मोठे व्हा, पण आर के लक्ष्मण यांनी जिवंत केलेला कॉमन मॅन विसरू नका. अशा शब्दात विधान परिषदेच्या उपसभापती शिवसेनेच्या उपनेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांनी उपस्थित विद्यार्थी वर्गाला मार्गदर्शन केले.

बालदिनाच्या निमित्ताने प्रख्यात व्यंगचित्रकार आर के लक्ष्मण यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ, त्यांच्या कलाकृतींच्या संग्रहालयाचे उदघाटन काल पुण्यात डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या प्रसंगी पंडित नेहरू, आर.के.लक्ष्मण आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करून डॉ. गोऱ्हे यांनी उपस्थित शालेय विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आणि या संग्रहालयाची भेट दिल्याबद्दल मुलांच्या पालकांचे अभिनंदनही त्यांनी केले. यावेळी पुणे महानगरपालिका आयुक्त श्री. विक्रम कुमारजी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर तसेच आर के लक्ष्मण यांचे सुपुत्र श्रीनिवास लक्ष्मण आणि स्नुषा उषा लक्ष्मण हे मान्यवर उपस्थित होते.

यावेळी नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, मुलांना आणि सगळ्यांनाच गोष्टी ऐकायला आवडतात. या गोष्टी विनोदी अंगाने संदेश देणाऱ्या असल्यास त्याचा अधिक चांगल्या प्रकारे आनंद घेता येतो. या संग्रहालयाच्या निमित्ताने दर्जेदार व्यंगचित्र म्हणजे काय व सर्वसामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून रोजच्या जीवनातली विसंगती कशी दाखवावी याचा आदर्श वस्तुपाठ मुलांना मिळेल यात शंकाच नसल्याचे त्यांनी सांगितले.

आर के लक्ष्मण आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या ऋणानुबंधांबद्दल सांगताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, बाळासाहेब आणि आरे.के.लक्ष्मण यांची भेट ही अतिशय हृद्य होती. दोन उच्च कोटीच्या कलाकारांनी एकमेकांना दिलेली दाद ही आठवणीत राहण्यासारखीच होती.