संसदेच्या आवारातील आंदोलनाला केंद्रसरकारने घातलेली बंदी दुर्दैवी – सुप्रिया सुळे

मुंबई – केंद्रसरकारने संसदेच्या आवारात आंदोलन, निदर्शने, उपोषण (Protests, protests, hunger strikes) आदी करण्यास बंदी घातली. सनदशीर मार्गाने विरोध दर्शविण्याचा हा लोकशाही प्रक्रियेतील महत्त्वाचा मार्ग अशारीतीने सरकारने बंद केला ही अतिशय दुर्दैवी बाब आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी ट्वीट करत नाराजी व्यक्त केली आहे.

संसदेच्या आवारातच राष्ट्रपिता  महात्मा गांधी (Father of the Nation Mahatma Gandhi) यांचा भव्य पुतळा आहे. महात्मा गांधी यांनी सनदशीर मार्गाने सत्याग्रह या आयुधाचा वापर स्वातंत्र्यलढ्यात केला होता. त्यांच्याच पुतळ्यासमोर सनदशीर मार्गाने विरोध प्रकट करण्यास केंद्रसरकारने बंदी घातली हेही दुर्दैवी असल्याचेही खासदार  सुळे म्हणाल्या.

यापुर्वी काही शब्द असंसदीय ठरवून ते उच्चारण्यास बंदी घालण्यात आली. आता आंदोलनासही बंदी घालण्यात आली आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांनी दिलेल्या संविधानातील अधिकार व स्वातंत्र्याचा हा संकोच आहे असेही खासदार सुळे यांनी सांगितले. हा निर्णय लोकशाही व्यवस्थेस घातक असून त्याचा फेरविचार करणे अतिशय गरजेचे आहे. तरी केंद्रसरकारने हा निर्णय तातडीने मागे घ्यावा अशी विनंती खासदार सुळे यांनी केली आहे.