काँग्रेसला राष्ट्रवादीचा धोबीपछाड; आख्खी महापालिकाच घेतली पक्षात !

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मालेगावचे माजी आमदार शेख रशीद शेख शफी आणि मालेगाव महानगरपालिकेच्या महापौर ताहेरा शेख रशीद यांच्यासह २८ नगरसेवकांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ, अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, माजी खासदार समीर भुजबळ, नाशिक ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र नाना पगार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महेबुब शेख, कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, मालेगाव तालुकाध्यक्ष संदीप पवार उपस्थित होते.

जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या सर्व नगरसेवकांचे स्वागत केले. तसेच पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. मालेगावमधील या पक्षप्रवेशामुळे आता पुढील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा आमदार निश्चित झाला आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. कोरोनाचा प्रभाव ओसरल्यानंतर आदरणीय शरद पवार साहेबांच्या उपस्थितीत मालेगावमध्ये मोठी सभा घेणार असल्याचे सुतोवाच त्यांनी केले. ज्याप्रमाणे राष्ट्रवादीने पिंपरी-चिंचवड आणि इतर महानगरपालिकांमध्ये विकास साधला आहे, त्याप्रमाणेच राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखाली मालेगावचा चेहरा-मोहरा बदलण्याचे काम करु, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील सर्वांचे स्वागत करत त्यांना शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, शेख रशीद शेख शफी हे १९९९ साली विधानसभेत आमदार म्हणून आले होते. मालेगावमधील प्रत्येक घटकाला मदत करण्यासाठी त्यांचा पुढाकार असायचा. मालेगावचे प्रश्न तळमळीने मांडताना आम्ही त्यांना पाहिले आहे. त्यांची समाजाशी बांधिलकी असल्यामुळे त्यांच्यासोबत मनपातील नगरसेवक राष्ट्रवादीत येत आहेत. आदरणीय पवार साहेबांनी देखील कधीही जातीपातीचा विचार न करता सर्वांना सोबत घेऊन पक्ष चालवला. अल्पसंख्याक समाजामध्ये शिक्षण कमी आहे, त्यामुळे या समाजाला शिक्षणात प्रगती करण्यासाठी मालेगाव येथे काय सुविधा उभारता येतील तसेच मौलाना अबुल कलाम आझाद महामंडळाच्या माध्यमातून काय योजना आखता येतील, याचा विचार आम्ही नक्कीच करु. तसेच हे आर्थिक वर्ष संपण्याआधी पुन्हा एकदा चांगला निधी मालेगावला देऊ, असे आश्वासन त्यांनी दिले.