खदखद होती तर अजित पवारांनी त्याचवेळी बाहेर पडायचे ना!; पटोले अजितदादांवर भडकले

मुंबई – कधी कधी समाधानाने काम करावं लागतं, तर कधी नाईलाजाने. उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) काळात आम्ही आनंदाने काम केलं, परंतु पृथ्वीराज चव्हाणांच्या (Prithviraj Chavan) काळात आम्ही नाईलाजाने काम केलं, असा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केला आहे. अजित पवारांच्या या वक्तव्यावरून आता कॉंग्रेस राष्ट्रवादी आमनेसामने आले आहेत. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी याच मुद्द्यावरून अजित पवारांना खडेबोल सुनावले आहेत.

खदखद होती तर अजित पवारांनी त्याचवेळी बाहेर पडायचे ना!
पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, २००४ साली काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये अजित पवार होते. त्यांचा नाईलाज होता तर त्यांनी मंत्रीपदाची शपथ कशासाठी घेतली? मंत्रीपदाची शपथ घ्यायला नको होती. पृथ्वीराज चव्हाण आमचे नेते आहेत, त्यांच्याबद्दल अजित पवारांनी असे बोलावी ही अपेक्षा नाही. खदखद वाटत होती तर त्यावेळीच सोडून जायला हवे होते. तसेच राजकारणातील कोणीही मुख्यमंत्री व्हायची इच्छा बाळगली तर त्यात वावगे काहीच नाही, अजित पवार यांच्याकडे १४५ चा बहुमताचा आकडा असेल तर त्यांनी जरूर मुख्यमंत्री व्हावे, असे नाना पटोले म्हणाले.