सत्यपाल मलिकांनी मोदींचा खरा चेहरा जनतेसमोर आणल्यानेच सीबीआयची नोटीस :- नाना पटोले

मुंबई – पुलवामा घटना झाली त्यावेळी सत्यपाल मलिक (Satyapal Malik) हे जम्मू काश्मीरचे राज्यपाल होते, त्यावेळच्या घटनेचे सत्य त्यांनी जनतेसमोर उघड केले. आपल्या जवानांवर केलेला तो भ्याड हल्ला आहे, त्यावर पंतप्रधानांनी उत्तर दिले पाहिजे पण उत्तर न देता नरेंद्र मोदी सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर आणला म्हणूनच सत्यपाल मलिकांना सीबीआयकडून नोटीस पाठवण्यात आली आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे.

प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, मोदी सरकारच्या विरोधात जो कोणी बोलेल त्याच्यामागे केंद्रीय तपास यंत्रणांच्या चौकशीचा समेमिरा लावला जातो हे चित्र आपण मागील काही वर्षांपासून पहात आहोत. सत्यपाल मलिक हे भाजपाचे वरिष्ठ नेते आहेत. जम्मू काश्मीरसह इतर राज्यांचे राज्यपाल म्हणून त्यांना मोदी सरकारनेच जबाबदारी दिली होती. जम्मू काश्मीरचे राज्यपाल असताना पुलवामा घटना घडली त्याचे वस्तुस्थिती सत्यपाल मलिक यांनी मांडली व त्यासोबतच भ्रष्टाचाराचा मुद्दाही मांडला. मलिक यांच्या वक्तव्याने मोदी सरकारचा खरा चेहरा जनता कळला म्हणून त्यांचा आवाज बंद करण्यासाठी सीबीआयमार्फत नोटीस पाठवून गप्प करण्याचा प्रयत्न केला आहे.

ना खाऊंगा, ना खाने दुंगा, म्हणाऱ्यांच्या पक्षातच आता भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या लोकांना घेवून वॉशिंग मशिनमध्ये धूवून घेतात का? असा प्रश्न सामान्य जनताच विचारत आहे. भाजपाने भ्रष्टाचाराची नकली मालिका चालवली, त्याला जनता आता ओळखून आहे. भाजपामध्ये अनेक भ्रष्टाचारी लोक आहेत त्यांच्यावर मोदी सरकार कारवाई का करत नाही. सत्यपाल मलिक यांनी वस्तुस्थिती मांडली त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिले पाहिजे त्याला ते उत्तर का देत नाहीत? मोदीजी जवाब दो ! अशी विचारणा देशातील जनता करत आहे. म्हणून मोदींना सत्यपाल मलिक यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका मांडली पाहिजे.