“राहुल गांधींना महिला भाऊ म्हणून मिठी मारतात, तशी मोदींना…”, प्रणिती शिंदेंचा पंतप्रधानांना टोला

भारत जोडो यात्रेत काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना अनेक महिलांनी मिठी मारल्याचे, त्यांचा हात हातात घेऊन चालल्याचे दृश्ये पाहायला मिळाली. परंतु जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) चालतील, तेव्हा त्यांना मिठी मारण्याची महिलांची हिंमत होणार नाही. कारण हे सरकार महिलेंकडे तुच्छ नजरेने पाहाते, अशी खोचक टिका काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde On Narendra Modi) यांनी केली आहे.

राज्यात अंगणवाडी सेविकांनी आंदोलन पुकारले आहे. सोलापुरात आंदोलनाचा दुसरा दिवस होता त्यावेळी काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी या आंदोलनाला भेट दिली. त्यावेळी त्या बोलत होत्या.

प्रणिती शिंदे म्हणाल्या. “माजी पंतप्रधान राजीव गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी जेव्हा चालतात, तेव्हा सर्व महिला भाऊ म्हणून मिठी मारतात. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिठी मारण्याची हिंमत होईल का? हे सरकार गोरगरिबांचं नाही. महिलांचं तर नाहीच नाही. महिलांकडे हे सरकार तुच्छ नजरेने पाहते. महिलांना न्याय मिळवून देणे दूरच पण, त्यांच्यावर अन्याय करणार हे सरकार आहे.” भाजपावर अशी टिका करतानाच इंदिरा गांधी आणि सोनिया गांधींची काँग्रेस तुमच्याबरोबर आहे, असा विश्वासही प्रणिती शिंदेंनी व्यक्त केला.