मराठी द्वेष्टा किरीट सोमय्या भाजपचा फ्रंटमँन; संजय राऊतांचा सोमय्यांवर घणाघात

मुंबई : मागील काही दिवसांपासून किरीट सोमय्या आणि शिवसेना यांच्यात वाक़युद्ध रंगलं आहे. किरीट सोमय्या हे खासदार संजय राऊत यांच्यावर वारंवार आरोप करत त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा गुन्हा पोलीस ठाण्यात दाखल करीत आहेत. याच पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन किरीट सोमय्यांवर निशाणा साधला आहे.

मराठी माणसांचा द्वेष मनामध्ये असु द्या. मराठी भाषा शालेय शिक्षणात सक्तीची असु नये यासाठी किरीट सोमय्या यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याच्या कडून तुम्ही काय अपेक्षा करताहेत. मराठी भाषाविरूद्ध जो माणूस न्यायालयात गेला आहे आणि तुम्हीच मराठी भाषेला अभिजित भाषेचा दर्जा प्राप्त करून देणार असल्याचं हे सांगताहेत. हे सांगण्या अगोदर याचा थोबाड तुम्ही बंद करा. मराठी द्वेष्टा किरीट सोमय्या भाजपचा फ्रंटमँन आहे, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, भाजपचं सरकार सत्तेत आलं नाही म्हणून इडी, सीबीआय या केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून आम्हाला त्रास देत आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला गुडघे टेकायला शिकवलं नाही. तुम्ही काहीही करा परंतु हे सरकार पडणार नाही. यानंतर लगेचच आमच्या आजूबाजूच्या लोकांवर इडीच्या धाडी पडल्या.

आजची पत्रकार परिषद ही इडीच्या कार्यालयासमोर घेण्याची चर्चा झाली होती. परंतु नंतर अजून आम्ही चर्चा झाली की सुरुवात इथून करू आणि अंत तिकडे करू. मग महाराष्ट्रात तुम्ही राहतंय की आम्ही राहतो ते नंतर बघू. हा महाराष्ट्र आमच्या बापाचा आहे, असंही संजय राऊत म्हणाले.