मुलाबाळांच्या प्रतिक्रियेवर मी उत्तर देणं योग्य दिसत नाही; पवारांनी उडवली नितेश राणेंची खिल्ली

पुणे – विरोधकांचा खरपूस समाचार घेण्यसाठी प्रसिद्ध असणारे भाजप आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांनी एक नवं ट्विट केलं आहे. त्यातून त्यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. ज्यावेळी नारायण राणे (Narayan Rane) यांनी शिवसेना सोडली होती. त्यावेळी त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती असा दावा त्यांनी ट्विटमध्ये केला आहे.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी त्यांना सुरक्षा पुरवू नका अशी सुचना दिल्याचा त्याच्यावरती आरोप करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार नितेश राणेंच्या ट्विटच्या माध्यमातून केलेल्या या दाव्याची जोरात चर्चा सुरु झाली आहे. तसेच त्यांनी पुढे ट्विटमध्ये माऊ माऊ संपू दे…मग आपण व्याजासह वस्त्रहरण सुरु करु असा आशय लिहिला आहे.

नितेश राणेंच्या आरोपांवरुन पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असताना पवार यांनी मोजक्या शब्दांमध्ये हा प्रश्न उडवून लावला. यावेळी त्यांनी नितेश राणेंचा उल्लेख ‘मुलंबाळ’ असा केला. उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंची सुपारी दिल्याचा आरोप नितेश राणेंनी केलाय, असं सांगत पत्रकाराने प्रश्न विचारला. त्यावर शरद पवार “मुलाबाळांच्या प्रतिक्रियेवर मी उत्तर देणं योग्य दिसत नाही,” असं म्हणत तिथून निघून गेले.