‘आमच्यावर आरोप करणाऱ्या नगरसेवकांनी केवळ आरोप न करता विकासकामांमध्ये आम्हाला सहकार्य करावे’

म्हापसा – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर म्हापश्यातील विकास कामांच्या मुद्द्यावरून विरोधक भाजपवर टीका करत आहेत. नगरपालिकेच्या माध्यमातून होणाऱ्या विविध विकासकामांवर विरोधक टीका करत असताना आता म्हापसा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा शुभांगी वायंगणकर यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये विरोधकांकडून होणाऱ्या आरोपांवर त्यांनी भाष्य केले.

वायंगणकर म्हणाल्या, आमची नगरपालिकेत सत्ता येवून सातच महिने झाले. जे नगरसेवक आज आमच्या सोबत नाहीत आणि शहरातील समस्यांबाबत तक्रारी करतात तेच नगरसेवक काही महिन्यांपूर्वी नगरपालिकेचा कारभार पाहत होते. कचरा प्रश्न सोडविण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. कचरा उचलण्याच्या कामाचे आउटसोर्सिंग केले आहे. आणि तोच सर्वात मोठा प्रश्न असून आज आम्ही या प्रश्नांवर तोडगा काढला आहे.

सरकारी निधी जो प्रत्येक वार्ड साठी मिळतो तो गेली चार वर्षे आम्हाला मिळाला नाही. परंतु तो निधी आता आमच्या हाती पडलेला आहे. त्यामुळे आता प्रलंबित सर्व कामांना निवडणुकीनंतर वेग येईल.शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण झालेले आहे. म्हापसा शहरात आणखी अनेक विकासकामे करण्याचा आमचा मानस आहे. या संदर्भात आम्हाला आमदार जोशुआ डिसुझा यांचे सहकार्य लाभत आहे. नगरपालिकेच्या माध्यमातून होणाऱ्या विकास कामांसाठी सर्व नगरसेवक मदत करतात. निवडणुकीनंतर पुन्हा एकदा सर्व नगरसेवकांना सोबत घेवून शहराच्या विकासाला पुढे घेवून जाऊ.

कुठलाही वार्ड विकास कामांपासून वंचित राहिला आहे असे कुणीही म्हणू शकत नाही. कारण, प्रत्येक वार्ड मध्ये चार-चार माणसे कामांसाठी नेमलेली आहेत. झाडू मारण्यासाठी तसेच इतर कामे करण्यासाठी माणसं नेमलेली आहे. छोटी छोटी कामे सुरूच असतात. तरीही काही लोकं तक्रार करतात कि म्हापसा शहरात विकास झालेला नाही असं त्या म्हणाल्या.

मार्केट समस्या

मासळी बाजार प्रकल्प हा माझ्या वेळचा नव्हता तर तो प्रकल्प विरोधी उमेदवार सुधीर कांदोळकर आणि आता आमच्या विरोधात गेलेले रायन ब्रागांझा यांच्या काळातील आहे. आणि त्याबाबत जर काही तक्रारी असतील तर याबाबत प्रश्न त्यांनाच विचारले पाहिजेत. माझ्या सात महिन्यांच्या कारकिर्दीत पूर्ण मासळी मार्केट,भाजी मार्केट पूर्णपणे तीन वेळा साफ केले आहे.दोन्ही मार्केटमधील विद्युत उपकरणे अनेकवेळा दुरुस्त केली आहेत. अलंकार थियेटर प्रकल्प हा आपणास पुढे न्यायचा आहे. त्यामुळे विरोधी नगरसेवक हे जे आरोप करत आहेत ते बिनबुडाचे आणि राजकीय स्वरूपाचे आहेत असे त्या म्हणाल्या.

विकासकामांमध्ये आम्हाला सहकार्य करा

गेली चार वर्षे कुणीही आणू न शकलेला निधी आपण मिळवला. आणि पुढील वर्षीचा निधी सुद्धा वेळेत मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही आमची कामे पूर्णपणे प्रामाणिकपणे करत आहोत. यंदाच्या बोडगेश्वर यात्रेतील गोळा झालेला कचरा वेळेत उचलला. आता आमच्यावर आरोप करणाऱ्या नगरसेवकांनी केवळ आरोप न करता विकासकामांमध्ये आम्हाला सहकार्य करावे असे आवाहन देखील त्यांनी केले.