गांधी कुटुंबीय गोव्यात केवळ सुटी एन्जॉय करायला यायचे; अमित शाह यांनी डागली तोफ

पणजी – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काल गोव्याच्या एकदिवसीय दौऱ्यावर होते. यावेळी गोव्यात एका सभेला अमित शाह यांनी संबोधित केलं. फोंडा विधानसभा मतदार संघात एका प्रचारसभेला संबोधित करताना अमित शाह यांनी भाजपानंच गोव्याचा विकास केला असल्याचा दावा केला. गोव्याच्या विकासासाठी भाजपच राजकीय स्थैर्य देऊ शकतो असा दावाही शहा यांनी केला.

राज्यातील नागरिकांपुढे भाजपचा सुवर्ण गोव्याचा विचार किंवा काँग्रेसचा गांधी परिवाराचा गोवा असे निवडीचे पर्याय आहेत, असे शहा यांनी नमूद केले.गांधी कुटुंबीयांना गोव्यात सुटीला येण्याची सवय आहे. त्यामुळे सुटीसाठी त्यांना पर्यटनस्थळ हवे आहे. मात्र भाजपसाठी गोवा विकासाचे माध्यम आहे. त्यामुळे जनतेने निवड करायची आहे असे त्यांनी नमूद केले.

भाजपानं गोव्याचं बजेट ४३२ कोटींहून (२०१३-१४) वाढवून २,५६७ कोटी (वर्ष २०२१) इतकं केलं, असं अमित शाह म्हणाले.  काँग्रेसच्या काळात बंद झालेल्या खाणी येत्या सहा महिन्यांत सुरू करण्यात येतील. यासाठी गेल्या 2 वर्षांपासून केंद्र आणि राज्य सरकारचे प्रयत्न सुरू होते. आता यातून मध्यम मार्ग काढण्यात आला आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या डंप पॉलिसीनुसार राज्यातील सर्व खाणींचा पारदर्शी लिलाव करून खाणी सुरू करण्यात येतील, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल वास्को येथे केली.