राज्यपालांच्या बेताल वक्तव्यामुळे भाजपची गोची; फडणवीसांवर आली सारवासारव करण्याची वेळ

मुंबई : राज्यपाल कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी जे.पी. रोड, अंधेरी (प) मुंबई येथील स्थानिक चौकाला दिवंगत श्रीमती शांतीदेवी चंपालालजी कोठारी यांचे नाव देण्यात आले, यावेळी, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचं मुंबई आणि महाराष्ट्र संदर्भात वादग्रस्त वक्तव्य समोर आलं आहे. मुंबई-ठाण्यातून (Mumbai-Thane) जर गुजराती आणि राजस्थानी लोकांना बाहेर काढल्यास इथे पैसेच राहणार नाहीत. मुंबई आर्थिक राजधानीही उरणार नाही असं वक्तव्य केलं आहे. कोश्यारींच्या या वक्तव्यानंतर नव्या वादाला तोंड फुटलं आहे. विरोधकांकडून कोश्यारींवर टीका करण्यात येतेय.

दरम्यान, भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईबाबत केलेल्या वक्तव्यावरून राजकीय वादंग निर्माण झाला असताना दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राज्यपालांच्या विधानाशी आम्ही सहमत नाही. असं फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे.

मला असं वाटतं की एकूणच या संपूर्ण बाबींना जर आपण बघितलं तर, एखाद्या समाजाच्या कार्यक्रमात गेल्यानंतर अनेकदा अतिशोयक्ती अलंकार हा वापरला जातो, तशाच प्रकारे राज्यपाल बोलले आहेत. मला विश्वास आहे की त्यांच्याही मनात मराठी माणसाबद्दल श्रद्धा आहे आणि त्यांनाही पूर्णपणे याची जाणीव आहे, की मुंबई किंवा महाराष्ट्राच्या विकासात, या देशाच्या विकासात मराठी माणसाचा सहभाग हा सर्वाधिक आहे. असं फडणवीसांनी बोलून दाखवलं.