हद्द झाली : नितेश राणे म्हणतात, राज्यपालांनी कोणाचाही अपमान केला नाही तर…

मुंबई : राज्यपाल कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी जे.पी. रोड, अंधेरी (प) मुंबई येथील स्थानिक चौकाला दिवंगत श्रीमती शांतीदेवी चंपालालजी कोठारी यांचे नाव देण्यात आले, यावेळी, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचं मुंबई आणि महाराष्ट्र संदर्भात वादग्रस्त वक्तव्य समोर आलं आहे. मुंबई-ठाण्यातून (Mumbai-Thane) जर गुजराती आणि राजस्थानी लोकांना बाहेर काढल्यास इथे पैसेच राहणार नाहीत. मुंबई आर्थिक राजधानीही उरणार नाही असं वक्तव्य केलं आहे. कोश्यारींच्या या वक्तव्यानंतर नव्या वादाला तोंड फुटलं आहे. विरोधकांकडून कोश्यारींवर टीका करण्यात येतेय.

दरम्यान, भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईबाबत केलेल्या वक्तव्यावरून राजकीय वादंग निर्माण झाला असताना दुसरीकडे भाजप आमदार नितेश राणे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची पाठराखण केली आहे. राज्यपालांनी कोणाचाही अपमान केला नसल्याचे नितेश राणे यांनी म्हटले आहे. राज्यपालांविरोधात बोलणाऱ्यांनी किती मराठी माणसांना श्रीमंत केले असा प्रश्न राणे यांनी उपस्थित केला आहे.

राज्यपालांनी मुंबईबाबत वक्तव्य केल्यानंतर विरोधकांकडून राज्यपालांवर टीकेची झोड उठवली जात आहे. तर, सत्ताधारी शिंदे गटानेही नाराजी व्यक्त केली आहे. दुसरीकडे भाजपचे आमदार नितेश राणे यांनी राज्यपालांनी काहीही चुकीचे म्हटले नसल्याचे सांगितले. त्यांनी फक्त त्या-त्या समाजाला त्यांच्या योगदानाचे श्रेय दिले असल्याचे राणे यांनी सांगितले. विरोधकांवर निशाणा साधताना राणे यांनी म्हटले की, राज्यपालांविरोधात बोलणाऱ्यांनी किती मराठी माणसांना मोठे किंवा श्रीमंत केले? किती मराठी तरुणांना मुंबई महापालिकेचे कंत्राट दिले? तेव्हा तुम्हाला शाह आणि अग्रवाल पाहिजे असतात असा टोलाही राणे यांनी लगावला.