ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचं निधन; मनोरंजनसृष्टीवर शोककळा

Seema Deo: मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध जेष्ठ अभिनेत्री सीमा देव (Seema Deo) यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले आहे. सीमा देव यांनी वांद्रे येथील राहत्या घरी आज सकाळी 7 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानं मराठी मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

सीमा देव यांनी वयाच्या 81 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे.  आनंद, जगाच्या पाठीवर,यंदा कर्तव्य आहे, या सुखांनो या, हा माझा मार्ग एकला चित्रपटांमध्ये सीमा यांनी काम केलं. सीमा देव यांचे पती रमेश देव हे अभिनेते होते. त्यांचे 22 फेब्रुवारी 2022 रोजी निधन झाले होते.

सीमा देव यांचा जन्म मुंबईतील गिरगाव येथे झाला. पुढे त्यांचा विवाह अभिनेते रमेश देव यांच्याशी झाला. अभिनेते अजिंक्य देव आणि दिग्दर्शक अभिनय देव ही त्यांची दोन मुलं आहेत. सीमा देव यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी पाच वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.