शरद पवारांच्या राष्ट्रवादी अध्यक्षपद राजीनाम्याच्या निर्णयावर फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई : गेल्या ६० वर्षांपासून देशाच्या राजकारणात आपला दबदबा निर्माण करणारे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनी आज एक मोठी घोषणा केली आहे. आज त्यांनी भाकरी फिरविण्याची सुरुवात स्वत:पासून केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होणार असल्याचं सांगत पुन्हा निवडणुकीला उभा राहणार नाही, अशी मोठी घोषणा शरद पवार यांनी केली.

१ मे १९६० ते १ मे २०२३ इतक्या प्रदीर्घ काळ काम केल्यानंतर कुठेतरी थांबण्याचा विचार मनात आला, असं सांगताना आता नवा अध्यक्ष कोण, याचा विचार पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी करावा, असं पवार म्हणाले. तथापि शिक्षण, शेती, सहकार, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात अधिक काम करण्याचा माझा मानस आहे. तसेच युवक, युवती व विद्यार्थी यांच्या संघटनांकडे आणि कामगार, दलित, आदिवासी व समाजातील इतर कमकूवत घटकांच्या प्रश्नांकडे माझे लक्ष राहिल,” असं शरद पवार यांनी जाहीर केलं. दरम्यान, या घोषणेनंतर आता राज्याच्या राजकारणात भूकंप झाला असून राजकीय नेत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया पुढे येत आहेत.

अशातच उपमुख्यमंत्री तथा भाजपा नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) शरद पवारांच्या या निर्णयावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, शरद पवार साहेबांचा हा वैयक्तिक निर्णय आणि राष्ट्रवादीची अंतर्गत बाब आहे. त्यावर बरीच चर्चा आणि मंथन सुरु आहे. या क्षणाला मी आताच त्यावर बोलणे योग्य नाही. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. योग्यवेळी त्यावर बोलू. मी अजून शरद पवार यांचे पुस्तक वाचलेले नाही. त्यामुळे त्यावर आताच बोलणार नाही.

मलाही एक पुस्तक लिहायचे आहे, ते योग्य वेळी लिहिणार आहे. त्यात त्यांनी काय म्हटले आहे आणि सत्य काय आहे, हे मी त्यात मांडीन, असेही शेवटी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.