भारताचा लाजिरवाणा पराभव, बांगलादेशने ४ ओव्हर शिल्लक ठेवत मिळवला सोपा विजय

ढाका: बांगलादेश विरुद्ध भारत संंघात रविवारी झालेला पहिला वनडे सामना यजमान संघाने १ विकेट राखून जिंकला. या सामन्यात बांगलादेशच्या गोलंदाज आणि फलंदाजांनी कौतुकास्पद कामगिरी केली आणि ४६ व्या षटकातच सामना खिशात घातला. दुसरीकडे भारतीय खेळाडूंचे दोन्ही विभागातील प्रदर्शन सरासरी राहिले. परिणामी भारतीय संघ ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत ०-१ अशा पिछाडीवर पडला आहे.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशच्या गोलंदाजांपुढे भारतीय फलंदाजांची कोंडी झाली. एकट्या केएल राहुलने चिवट झुंज दिली. तो ७० चेंडूत सर्वाधिक ७३ धावा करून बाद झाला. यादरम्यान त्याने ४ षटकार आणि ५ चौकारही मारले. राहुलला वगळता इतर फलंदाजांना ३० धावाही करता आल्या नाहीत. भारताचे ७ फलंदाज तर एकेरी धावाच करू शकले. या डावात बांगलादेशकडून शाकिब अल हसनने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या. तर एबादत हुसैननेही ४ विकेट्स काढल्या.

प्रत्युत्तरात भारताच्या गोलंदाजांनी चांगले प्रयत्न केले. मोहम्मद सिराजने ३ विकेट्स, कुलदीप सेन व वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. मात्र ते संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरले. बांगलादेशकडून कर्णधार लिटन दासने सर्वाधिक ४१ धावा केल्या. तसेच मेंहिदी हसननेही विजयात महत्वाची भूमिका बजावली. त्याने शेवटी नाबाद ३८ धावा करत संघाला विजय मिळवून दिला.