प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या दहाव्या हप्त्याचे वितरण; प्रधानमंत्री साधणार शेतक-यांशी संवाद

वर्धा :- केंद्र शासनाच्या वतीने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत शेतक-यांना दहाव्या हप्त्याचे वितरण प्रधानमंत्र्यांचे हस्ते दि.1 जानेवारी 2022 रोजी करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रम ऑनलाईन पार पडणार आहे.

केंद्र शासनाचे वतीने शेतक-यांना दिलासा देण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत प्रती वर्षी 6 हजार रुपये शेतक-यांना दिले जाते. या योजने अंतर्गत शेतकरी सातबारा धारक, अल्प भूधारक असणे आवश्यक आहे. तसेच शेतकरी नोकरी करणारा नसावा. यासह शासनाने निर्धारित केलेल्या निकषात बसणा-या शेतक-यांना या योजनेचा लाभ दिला जातो. सदर लाभ एका वर्षात तीन टप्प्यात प्रत्येकी दोन हजार रुपये या प्रमाणे देण्यात येतो. सदर लाभाची रक्कम थेट शेतक-यांच्या बँक खात्यात जमा केली जाते.

योजने अंतर्गत आतापर्यंत शेतक-यांना नऊ हप्त्याचे वितरण करण्यात आले आहे. दहाव्या हप्त्याचे वितरण तसेच शेतकरी उत्पादक संस्थांना त्यांच्या समभाग निधीचे वितरण दि. 1 जानेवारी रोजी प्रधानमंत्र्याच्या हस्ते होणार आहे. ऑनलाईन होणा-या या कार्यक्रमात प्रधानमंत्री शेतकरी व शेतकरी उत्पादक संस्थेच्या शेतक-यांशी संवाद साधाणार आहे.

सदर कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण डीडी किसान, राष्ट्रीय दुरदर्शन वाहिनी तसेच कार्यक्रमाचे थेट वेबकास्ट pmindiawebcast.nic.in यावर देखील उपलब्ध होणार आहे. जिल्हयातील शेतक-यांनी या ऑनलाईन कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाचे वतीने करण्यात आले आहे.