४८ तासांचं अल्टीमेटम देण्यापेक्षा दत्त उपासना करा; अनिकेत शास्त्रींचा शरद पवारांना खोचक सल्ला

एकीकडे महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद चिघळत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीदेखील कर्नाटक सरकारला ४८ तासांचा अल्टीमेटम देत इशारा दिला आहे. येत्या २४ तासात कर्नाटक सरकारकडून महाराष्ट्राच्या तसेच मराठी भाषिक जनतेवर हल्ले करणं, त्यांना त्रास देणं थांबवण्यात आलं नाही तर परिस्थिती चिघळू शकते. महाराष्ट्रातील जनतेच्या संयमाचा बांध फुटला तर त्याला सर्वस्वी केंद्र सरकार आणि कर्नाटक सरकार जबाबदार असेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिला.

मात्र यावर आक्षेप घेत महंत अनिकेत शास्त्री जोशी (Aniket Shasri Joshi) यांनी शरद पवारांवर कठोर शब्दांत टीका केली आहे. मागील चाळीस पन्नास वर्षांत हा प्रश्न सोडवला नाही, आता दत्त उपासना करा, असा खोचक सल्ला शास्त्रीनी पवारांना दिला आहे.

अनिकेल शास्त्री जोशी म्हणाले, शरद पवार हे ज्येष्ठ नेते असून त्यांनी एकदा नव्हे तर दोनदा मुख्यमंत्री पद भूषविलेले आहेत. त्याचबरोबर केंद्रातील अनेक उच्च पदे त्यांनी भूषाविलेले आहेत. महाराष्ट्र्र कर्नाटक प्रश्नी ४८ तासांचा अल्टिमेटम दिला, अन सीमा प्रश्न सोडविण्याची मागणी केली. मात्र शरद पवार यांची पन्नास वर्षांची कारकीर्द ही राजकारणाशी संबंधित आहे, तर ४०-५० वर्षांमध्ये हा प्रश्न त्यांनी सोडवला नाही आणि ते आता ४८ तासाची मुदत देत आहेत, हे कोणत्या तत्वात बसते, असा सवाल शास्त्री यांनी केला आहे.

ते पुढे म्हणाले, आज दत्त जयंती असून महाराष्ट्रातून अनेक भाविक भक्त हे गाणगापूरला जात असतात. गाणगापूरला मोठी यात्रा असल्याने लाखो भाविकांची गर्दी या ठिकाणी होत असते. मात्र याचवेळी शरद पवार यांनी ४८ तासांचा अल्टिमेटम दिला आहे. त्यामुळे गाणगापूरला जाणाऱ्या भाविकांना जर काही कमी जास्त झालं तर याची सर्व जबाबदारी ही शरद पवार यांची असेल, महाराष्ट्राचा हा वाद चिघळवण्याचा ते प्रयत्न करत आहेत, त्यांनी आज दत्त उपासना करावी असं त्यांना सांगू इच्छितो, असे आवाहनच महंत अनिकेत शास्त्री जोशी यांनी केले आहे.