बॉलीवूडला उच्च पातळीवर पोहोचवण्यात मुस्लीमांचे सर्वाधिक योगदान- शरद पवार

नागपूर: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी शनिवारी (०८ ऑक्टोबर) मोठा दावा केला आहे. बॉलीवूडमध्ये (Bollywood) मुस्लीम समुदायाचे (Muslim Community) मोठे योगदान असून ही गोष्ट नाकारता येणार नाही. बॉलीवूडला उच्च पातळीवर पोहोचवण्यात मुस्लीम अल्पसंख्याकांचे मोठे योगदान असल्याचेही शरद पवार यांनी म्हटले आहे. ते नागपूर येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते.

“जर आपण आज कला, कविता आणि लेखन याबद्दल बोललो, तर अल्पसंख्याकांमध्ये या वर्गांमध्ये योगदान देण्याची सर्वाधिक क्षमता आहे. बॉलिवूडमध्ये सर्वात जास्त योगदान कोणाचे आहे? मुस्लिम अल्पसंख्याकांचे सर्वाधिक योगदान आहे आणि आपण त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही,” असे शरद पवार म्हणाले.

“भारत देशाच्या लोकसंख्येमध्ये अल्पसंख्याकांचा मोठा वाटा असूनही त्यांना योग्य वाटा मिळत नसल्याची भावना मुस्लीम समाजातील लोकांमध्ये आहे,” असे शरद पवार यांनी सांगितले. “अल्पसंख्यांकांकडे गुणवत्ता आहे. त्यांना जर समान संधी मिळाली तर मला खात्री आहे, अल्पसंख्यांक समाज आणि त्यांच्या पुढील पिढ्या देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतील,” असेही शरद पवार म्हणाले.