रशियानं युक्रेनविरुध्द रासायनिक शस्त्रात्रांचा वापर केल्यास रशियाला मोठी किंमत मोजावी लागेल – बायडेन

न्युयोर्क – अमेरिका आणि नाटो संघटना रशियाच्या विरुध्द युक्रेनमध्ये लढणार नाही असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी स्पष्ट केलं आहे. अशी परिस्थिती उद्भवणं हे तिसरं विश्वयुध्द असेल असा इशाराही त्यांनी दिला. नाटो समूहातील देशांच्या प्रत्येक इंच जमिनीचं रक्षण केलं जाईल. रशियानं युक्रेनविरुध्द रासायनिक शस्त्रात्रांचा वापर केल्यास रशियाला मोठी किंमत मोजावी लागेल असा इशाराही त्यांनी दिला.

युक्रनमध्ये अपारंपारिक शस्त्रांत्रांचा वापर झाला तरी अमेरिका युक्रेनमध्ये आपलं सैन्य पाठवणार नाही असं व्हाईटहाऊसचे प्रवक्ते जेन पाल्की यांनी गुरुवारीच सांगितलं होतं. दरम्यान, बायडन यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादेमिर झेलेन्स्की यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली आणि युक्रेनियन लोकांसाठी अमेरिकेकडून दिलं जाणारं मानवतावादी संरक्षण आणि आर्थिक मदत याबाबत माहिती दिली.

दरम्यान, G7 देश आणि युरोपियन संघासह अमेरिका, रशियासाठी सर्वात अनुकूल राष्ट्राचा दर्जा रद्द करण्याची मागणी करेल. अशी घोषणा अमेरिकेनं केली आहे. रशियाकडून मोस्ट फेव्हर्ड नेशनचा दर्जा काढून घेतल्यास अमेरिका आणि सहयोगी देशांना काही रशियन उत्पादनाच्या आयातीवर उच्च शुल्क लागू करण्याची परवानगी मिळेल. युरोपियन संघ 2027 पर्यंत रशियन गॅस, तेल आणि कोळसा यावरील अबलंबित्व कमी करण्यासंदर्भातील प्रस्ताव येत्या मे महिन्यापर्यंत मांडणार आहे. कॅनडानंही रशियातील तेल आयातीवर बंदी घातली आहे. इतर पश्चिमी देशांनीही रशियावर निर्बंध घातल्यानं रुबलचं मूल्य कमी झालं आहे. दरम्यान, रशियावर कोणत्याही प्रकारच्या निर्बंधांचा परिणाम होणार नसल्याचं रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी सांगितलं.