रस्त्यावर उतरुन नागरिकांना त्रास होईल असं कृत्य करु नका : शंभूराज देसाई

मुंबई  – औरंगाबाद येथील जाहीर सभेत पोलिसांनी घालून दिलेल्या १६ अटींपैकी १२ अटींचे उल्लंघन केल्याप्रकरणी औरंगाबादच्या सिटी चौक पोलीस ठाण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS president Raj Thackeray) यांच्यासह आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय औरंगाबादमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा पार पडल्यानंतर आता मुंबई पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना नोटीसा बजावण्यास सुरुवात केली आहे.

राज ठाकरे यांनी या सभेमध्ये 4 मे नंतर राज्यात मशिदीसमोर हनुमान चालीसा(hanumanChalisa) वाजवण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. त्यामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलिसांनी खबरदारी म्हणून हिंदू संघटनेचे संबंधित असलेल्या कार्यकर्त्यांना नोटीस बजावली आहे. सभेनंतर राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी विविध स्तरांतून होत होती. अशातच औरंगाबाद पोलिसांनी राज ठाकरे यांच्या सभेची टेप ऐकून राज ठाकरे यांच्या सभेत किती नियम पाळले आणि किती टाळले याचा आढावा घेतला. त्यानंतरच औरंगाबादमधील राज ठाकरे यांच्या सभेत पोलिसांनी घालून दिलेल्या अटींचं उल्लंघन झाल्याचं निष्पन्न झालं. त्यामुळे राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, हा गुन्हा दाखल झाल्यानंतर आता मनसेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. दुसऱ्या बाजूला राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Minister of State for Home Affairs Shambhuraj Desai) यांनी मनसेला शांततेचं आवाहन करत कायदा हातात न घेऊ नये असं म्हटलं आहे. अटी-शर्तींसह औरंगाबाद पोलीस आयुक्तांनी मनसेच्या सभेला परवानगी दिली होती. या सभेदरम्यान अटी-शर्तींचं उल्लंघन झालं असेल तर आयुक्तांनी त्यांचा अधिकार वापरुन कारवाई केली असेल. कायदा सगळ्यांसाठी समान आहे. हे कायद्याचं राज्य आहे. कायदा हातात घेऊन रस्त्यावर उतरायचं हे चालणार नाही. कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी महाराष्ट्राचे पोलीस सज्ज आहेत. मनसेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना आवाहन करतो की, कायद्याला कायद्याने काम करु द्या, पोलिसांना त्यांचं काम करु द्या. कारवाई योग्य वाटत नसेल तर न्यायालय आहे, तिथे न्याय मागा. पण रस्त्यावर उतरुन सामान्य नागरिकांना त्रास होईल असं कृत्य करु नये, असं शंभूराज देसाई म्हणाले.