पहाटेची अजान सुरु होताच मनसैनिकांनी लावली हनुमान चालीसा

मुंबई – जिथे जिथे भोंग्यावरून बांग दिली जाते तिथे तिथे भोंग्यावरून हनुमान चालीसाचे(Hanuman Chalisa)  पठण करावे, असे आवाहन करीत मनसेचे प्रमुख राज ठाकरे(MNS chief Raj Thackeray)  यांनी भोंग्यांचा त्रास काय होतो हे त्यांनाही समजू दे, असं म्हटलं आहे. देशभरात प्रत्येक राज्यात आपापल्या सत्ताधाऱ्यांना हिंदुची ताकद(The strength of Hindus)  दाखवून द्या, असा आदेश राज यांनी कार्यकर्त्यांना दिला. राज ठाकरे यांनी बुधवारपासून भोंग्यांविरोधात आंदोलन सुरू करण्याचे आवाहन करणारे पत्र प्रसारित केले असून याच पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक शहरांमधील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय.

ठाण्यातील मनसैनिकांनी आज पहाटे झालेल्या अजानचा विरोध करत लाऊडस्पीकर वर हनुमान चालिसा लावली. पहाटे 5.14 मिनटांनी ठाणे इंदिरा नगरमधील एका मशिदीवर अजान झाली. त्याचा विरोध म्हणून मनसे कार्यकर्ते पप्पू कदम यांनी या मशिदीच्या जवळच असलेल्या इंदिरा डोंगरावरच्या महालक्ष्मी मंदिरात भोंगा लावून हनुमान चालिसा पठण सुरू केलं. तर कल्याण डोंबिवलीमध्ये 50 हून अधिक कार्यकर्त्यांना पोलीस यंत्रणेकडून नोटीस पाठविण्यात आल्या होत्या.

काल रात्रीच्या सुमारास मनसेच्या 20 ते 25  कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. काल रात्रीपासूनच मशिद-मंदिर परिसरात पोलिसांची गस्त सुरू आहे. कल्याण परिसरातील मशिदींमध्ये पहाटेच्या सुमारास अजान भोंग्याविना झाली. अजानसाठी लाऊडस्पीकर लावण्यात आले नव्हते. तसेच, नवी मुंबई- ऐरोलीजवळच्या जामा मशिदीसमोर हनुमान चालिसा पठणाचा प्रयत्न करण्यात आला होता. हनुमान चालिसा पठणाचा प्रयत्न करणाऱ्या मनसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.